सामना अग्रलेख – रशियाच्या भूमीवरून… मोदींचे शांती आख्यान

पुतिन एकीकडे ‘युक्रेन युद्धाचे समाधान शांततेच्या चर्चेतच आहे,’ असे सांगणाऱ्या मोदींच्या गळाभेटी घेतात आणि दुसरीकडे त्यांच्या शांततेच्या प्रवचनाकडे दुर्लक्ष करीत युक्रेनवरील बॉम्ब वर्षाव सुरूच ठेवतात. मोदीदेखील रशियन भूमीवरून सर्व समस्या शांततेच्या मार्गानेच सुटतील, असे बोधामृत पाजतात आणि भारतात परतल्यावर मणिपूर समस्येचे समाधान शांततेत आहे हा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. मतांचे ‘समाधान’ धार्मिक पेटवापेटवीत आहे, हे कृतीतून दाखवून देणारे मोदी रशियन भूमीवरून शांती आख्यान देतात. पुतिन आणि मोदी यांच्यातील ‘अनुवादकाशिवाय समजता येणाऱ्या घनिष्ठ संबंधां’चे गुपित दोघांच्या याच दांभिकपणात असावे! 

पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. जुलै महिन्यातही ते तेथे गेले होते. आता ते 16 व्या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या निमित्ताने रशियाला गेले आहेत. तसेही मोदी हे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने परदेशामध्ये फिरतच असतात. निमित्त मिळाले की त्यांचे विमान एखाद्या देशात उड्डाण घेतेच घेते. जुलै महिन्याप्रमाणे आताही रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी मोदींची गळाभेट घेतली. फक्त या वेळी पुतिन यांनी जी मिश्कील वगैरे टिपणी केली ती नवीन म्हणता येईल. पुतिन असे म्हणाले की, ‘आमचे संबंध इतके घनिष्ठ आहेत की, आम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही.’ त्यावर म्हणे मोदी यांनाही हसू आवरले नाही. आता पुतिन जे म्हणाले त्याचा अर्थ मोदींना कसा समजला? एकतर पुतिन हिंदीत बोलले असावेत किंवा मोदी हे विश्वगुरू असल्याने त्यांना रशियन भाषादेखील अवगत असावी. मात्र पुतिन यांची टिपणी मोदी यांना हिंदी अनुवादामुळे समजली! मोदी-पुतिन यांच्यात तीन महिन्यांत दोनदा गळाभेट होते, चर्चेच्या फेऱ्या होतात म्हटल्यावर मोदी-पुतिन यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठच असणार! पुतिन आणि मोदी या दोघांची स्वभाव वैशिष्ट्ये, कार्यशैली, अहंकार, दुटप्पीपणा अशा

अनेक गोष्टी सारख्याच

आहेत. पुतिन यांनी त्यांचा हट्ट आणि अहंकारासाठी युक्रेनवर युद्ध लादले. तेथील लाखो निरपराध्यांचे बळी जात असताना पुतिन यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मोदी यांचेही त्यापेक्षा वेगळे कुठे आहे? मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्य वर्ष-दीड वर्ष वांशिक हिंसाचाराने जळत आहे. हजारो निरपराध्यांचा त्यात बळी गेला आहे. मात्र मोदी हेदेखील शांतच आहेत. रशिया-युक्रेन युद्ध थांबायला हवे, त्यांच्यातील समस्या शांततेच्या मार्गानेच सुटू शकतात, असे आख्यान रशिया-युक्रेनच्या भूमीवर जाऊन देणारे मोदी भारतात असताना ना मणिपूर हिंसेवर काही बोलतात ना तेथील समस्या शांततेच्याच मार्गाने सुटू शकते, याचा साक्षात्कार त्यांना होतो. जुलैमध्ये मोदी हे युक्रेनच्या युद्धभूमीवर गेले होते. त्या वेळीही त्यांनी ‘जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची म्हणजे शांततेची गरज आहे,’ असे बोधामृत पाजले होते. आताही रशियाच्या भूमीवरून त्यांनी पुन्हा तीच टेप वाजवली. ‘समस्यांचे समाधान शांततेतच मिळते, त्यासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करायला तयार आहोत.’ अशी शांततेची कबुतरे त्यांनी रशियातील कझान येथे उडवली. का हो मोदी, मग हीच शांततेची कबुतरे तुम्हाला मणिपूरसाठी उडवावीशी का वाटत नाहीत? युक्रेन-रशिया यांच्यातील

शांततेसाठी

तुम्ही जरूर सहाय्य करा, परंतु आधी तुमच्या पायाखाली जळणाऱ्या मणिपूरकडे पहा! ‘माझे मणिपूर वाचवा हो’ ही ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती बॉक्सर मेरी कोम हिची आर्त विनवणी तुमच्या मनाला पाझर का फोडू शकली नाही? पुतिन यांचेही कान निरपराध युक्रेनवासीयांच्या आक्रोशाने कुठे थरथरत आहेत? पुतिन एकीकडे ‘युक्रेन युद्धाचे समाधान शांततेच्या चर्चेतच आहे,’ असे सांगणाऱ्या मोदींच्या आनंदाने गळाभेटी घेतात आणि दुसरीकडे त्यांच्या शांततेच्या प्रवचनाकडे दुर्लक्ष करीत युक्रेनवरील बॉम्ब वर्षाव सुरूच ठेवतात. मोदीदेखील रशियन भूमीवरून जागतिक शांततेची कबुतरे उडवतात. सर्व समस्या शांततेच्या मार्गानेच सुटतील, असे बोधामृत पाजतात आणि भारतात परतल्यावर मणिपूर समस्येचे समाधान शांततेत आहे हा विचारही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. ‘विश्वगुरू’ म्हणून ते ‘शांतिदूत’ बनण्याचा प्रयत्न करतात, परंतु भारताचे पंतप्रधान म्हणून मणिपूरसाठी शांतिदूत बनत नाहीत. आपल्या पक्षाच्या मतांचे ‘समाधान’ धार्मिक ध्रुवीकरण आणि पेटवापेटवीत आहे, हे दहा वर्षांपासून कृतीतून दाखवून देणारे मोदी रशियन भूमीवरून शांती आख्यान देतात. पुतिन आणि मोदी यांच्यातील ‘अनुवादकाशिवाय समजता येणाऱ्या घनिष्ठ संबंधां’चे गुपित दोघांच्या याच दांभिकपणात असावे!