लहान भावानं विश्वासघात केला; कसायला जमीन दिली तर म्हणतोय सातबारा माझ्याच नावावर! भाजप आमदाराला घरचा ‘आहेर’

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकीकडे उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू असून दुसरीकडे वेगवेगळ्या मतदारसंघात भाऊबंदकीही उफाळून आली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा मतदारसंघातही दोन भावांमध्ये शा‍ब्दिक चकमक सुरू आहे.

भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांच्यावर त्यांचे बंधु केदा आहेर यांनी सडकून टीका केली आहे. लहान भावाने माझा विश्वासघात केला असून जो भावाचा झाला नाही तो जनतेचा काय होणार? असा सवाल केदा आहेर यांनी उपस्थित केला.

माझ्या जीवावर त्यांनी दोन वेळा आमदारकी भोगली. आता सन्माने बाजुला व्हायला हवे होते, मात्र त्याने माझ्याशी गद्दारी केली. जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. राजकारणापलीकडेही भाऊबंदकी, कुटुंब असते. पाच वर्ष कसायला जमीन दिली तर सातबाराच माझ्या नावावर आहे असे तो म्हणतोय. काय न्यायनीती आहे की नाही? असा सवालही केदा आहेर यांनी केला.

विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी, नाशिक भाजपमध्ये गटबाजी उफाळणार

दरम्यान, केदा आहेर यांच्या समर्थनार्थ देवळाच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. केदा आहे हे बंडखोरीच्या तयारीत असून पुढील मेळाव्यात निर्णय घेणार आहेत.