लोकमताच्या शेअर बाजारात ट्रेन्ड आमच्या बाजुनं, आम्ही उद्याचे सत्ताधारी! – संजय राऊत

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि आप असा महाविकास आघाडीचा मोठा संसार आहे. मंगळवारी रात्री जागावाटपाचे जवळजवळ 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. इतरांनी याद्या जाहीर केल्या, कारण त्यांना विरोधी पक्षात बसायचे आहे. आम्हाला सरकार बनवायचे असून आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून, मापून, मोजून जागावाटप करत आहोत. सत्ताधाऱ्यांना जेवढा वेळ लागतो तेवढा आम्हाला लागला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. आज सायंकाळपर्यंत तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करतील अशी माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

शिवसेना किती जागा लढणार या प्रश्नावर राऊत यांनी सूचक विधान केले. शिवसेना या मैदानातील अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे शिवसेनेला सेंच्युरी मारावीच लागेल. शिवसेनेने फक्त जागावाटपातच नाही, तर विजयातही सेंच्युरी मारावी अशी लोकांची अपेक्षा आहे. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान जपणारा, मराठी माणसाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे, असे राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचे नेतृत्व कोण करणार असे विचारले असता राऊत म्हणाले की, आम्हाला सत्ता स्थापन करायची आहे. याद्या जाहीर होऊ द्या. जागावाटप झाले, निवडणुका होतील, 23 तारखेला निकाल लागतील आणि निकाल लागत असतानाच नेतृत्व कोण करणार हे सांगेल. तसेच याद्या जाहीर झाल्या नसल्या तरी एबी फॉर्म दिलेले आहेत. शिवसेनेत याद्या जाहीर करण्याची परंपरा नाही. आम्ही एबी फॉर्म देतो आणि त्यानुसार त्या-त्या ठिकाणी लोक अर्ज भरायला गेले आहेत. कुणी अर्ज भरले ते तुम्हाला कळेल आणि उद्यापासून ‘दै. सामना’मध्ये त्या संदर्भात माहिती यायलाही सुरुवात होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

मशाल धगधगणार! महाराष्ट्र जिंकणार!! ‘मातोश्री कृपा’… उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेशासाठी गर्दी

लोकमताच्या शेअर बाजारात ट्रेन्ड आमच्या बाजुने

शिवसेनेला बंडखोरीची भीती नाही. ज्यांना वर्षानुवर्ष उमेदवारी देऊन निवडून आणले ते सोडून गेले. ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या, मंत्रीपद दिली, ‘रंकाचे राव’ केले ते रावसाहेब सगळे सोडून गेले. त्यामुळे बंडखोरीची भीती आम्हाला नाही, असे राऊत म्हणाले. तसेच आमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. याचाच अर्थ आम्ही सत्तेवर येत आहोत. लोकमताच्या शेअर बाजारात ट्रेन्ड आमच्या बाजुने असल्याने आमच्याकडे इनकमिंग होत आहे. शिवसेनेमध्ये आज, उद्याही पक्षप्रवेश होत असून इनकमिंग सुरुच आहे. याचाच अर्थ शिवसेना, महाविकास आघाडी मजबुत स्थितीत आहे, असे राऊत म्हणाले.

दादर, माहीम मतदारसंघात शिवसेना कायम लढत आलेली

माहीम मतदारसंघात मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, या मतदारसंघात आमच्याच परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचे राजकारणामध्ये स्वागत करावे ही आमची परंपरा, संस्कृती आहे. पण दादर, माहीम मतदारसंघात शिवसेना कायम लढत आलेली आहे. याच भागात शिवसेनेची स्थापना झाली आणि जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असे कधी होत नाही.

शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही

वरळीमध्ये आदित्य ठाकरे मागच्या इतक्याच मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्याशिवाय राहणार नाही. वरळीच्या जनतेने आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व आणि काम पाहिले आहे. लोकांसाठी धावणारा असा हा तरुण नेता आमचा आहे आणि आम्हाला वरळीची चिंता अजिबात वाटत नाही. किंबहुना महाराष्ट्रात असे अनेक मतदारसंघ आहेत जे आम्ही खात्रीने सांगतो की आम्ही जिंकतो आहोत, असेही राऊत म्हणाले. तसेच शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. राजकारणात निवडणूक लढताना आमचे प्रमुख नेते हे समोर कोणतेही आव्हान आले तरी ते आव्हान स्वीकारून निवडणुकीला उभे असतात, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)