विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला मंगळवारपासून सुरुवात होऊनदेखील अनेक ठिकाणी अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार असल्याचे सूतोवाच मिळताच शहर भाजपच्या पोटात गोळा आला आहे. हा मतदारसंघ वाचविण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांनी मुंबई गाठली खरी, पण मुंबईत वरिष्ठ नेत्यांनी या माजी नगरसेवकांची खरडपट्टी काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला ,सोडण्याबाबत जवळपास निर्णय झाल्याची चर्चा आहे.
खडकवासला मतदारसंघातील विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना भाजपने ‘होल्डवर’ ठेवले आहे. विद्यमान आमदारांना विरोध असल्याने त्यांच्या जागी पर्यायी उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, पोर्शे अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्याचे विरोधकांकडून भांडवल व्हायला नको म्हणून मतदारसंघ अदलाबदल करण्याचा नवीन फॉर्म्युला चर्चेत आला. भाजपला वडगाव शेरी आणि त्याबदल्यात खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्याबाबत निर्णय जवळपास झाल्याची चर्चा कानावर येताच शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री 11च्या सुमारास बैठक घेतल्याचे बोलले जात आहे. काही करून आपला हक्काचा मतदारसंघ न सोडण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यानुसार खडकवासला मतदारसंघातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
विद्यमान आमदारांना उमेदवारी द्यायची नसेल तर भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली. मात्र, सर्व्हेमध्ये खडकवासला मतदारसंघ हातातून जात असल्याचे दाखवीत असताना भाजपकडे पर्यायी उमेदवार का तयार झाला नसल्याचा जाब बावनकुळे यांनी विचारल्याची चर्चा आहे. मग भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. ‘पक्ष कोणाला उमेदवारी द्यायची, हे ठरवेल. तुम्ही संघटनेचे काम करा,’ असे फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.
अजित पवार गटाला का हवाय खडकवासला?
‘खडकवासला’तून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे विकास दांगट यांचे काम करण्यास भाजपचे नेते तयार नाहीत. गेल्या पाच ते सात वर्षांपासून राजकारणापासून दूर राहिलेले आणि भाजपच्या एका नगरसेवकाने पालिका निवडणुकीत पराभव केल्याने दांगट यांना भाजपकडून विरोध आहे. तर, मतदारसंघातदेखील एखादा टापू वगळता अजित पवार गटाची फार ताकद नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अजित पवार गटाला हा मतदारसंघ का हवाय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला असून, आत्ता मतदारसंघ ताब्यात घेऊन भविष्याची ही साखरपेरणी आहे का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
मतदारसंघ गमावून भाजपला काय मिळणार?
विद्यमान आमदार तापकीर यांना पक्षाअंतर्गत विरोध असून, भाजपला या मतदारसंघात विजयाची खात्री नसल्याचे बोलले जात आहे. खडकवासलात भाजप इच्छुकांचीदेखील मोठी संख्या आहे. मात्र, पक्षाअंतर्गत पर्यायांचा विचार न करता मतदारसंघ अजित पवार गटाला देऊन भाजपला काय मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.