हिंदुस्थान-चीनमध्ये विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल, लडाखची जमीन गिळणाऱ्या चीनचा खरा चेहरा लष्करप्रमुखांनी दाखवला

हिंदुस्थान आणि चीन दरम्यान एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याचा करार झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही आमचा सीमा विवाद एकत्र सोडवू असे म्हटले आहे. परंतु लडाखमधील जमीन सातत्याने हळूहळू गिळंकृत करणाऱया चीनचा खरा चेहरा लष्करप्रमुखांनी दाखवला आहे. हा करार चांगला आहे. मात्र, सर्वात आधी दोन्ही देशांना पुन्हा विश्वास निर्माण करावा लागेल. त्यासाठी सैनिकांनी एकमेकांना पाहणे आणि बोलणे गरजेचे आहे. यासाठी पेट्रोलिंगद्वारे योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जाईल, असे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थान आणि चीनने 21 ऑक्टोबर रोजी गस्त घालण्यावर सहमती दर्शवली होती. दोन्ही देशांमध्ये सीमेवर गस्त व्यवस्थेबाबत एक करार झाला आहे. यामुळे मे 2020पूर्वीची गलवान संघर्षासारखी परिस्थिती पूर्वपदावर येईल, हे सकारात्मक पाऊल आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आज लष्करप्रमुखांनी दोन्ही देशांमध्ये विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल, अशी कबुली दिली आहे. दरम्यान, आम्ही पुन्हा विश्वास संपादन करण्याच्या प्रक्रियेत असून त्यासाठी वेळ लागेल, असे लष्करप्रमुखांनी म्हटले आहे.

सैन्य मागे घेणेही तितकेच महत्त्वाचे

दोन्ही देशांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी सैन्य मागे घेणे आणि बफर झोन व्यवस्थान करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा एकमेकांचे ऐकू आणि एकमेकांना समाधानी आणि संतुष्ट करू तेव्हाच विश्वास निर्माण करता येईल. तयार झालेल्या बफर झोनमध्ये आम्ही जाऊ, असा विश्वास व्यक्त करू शकू, याकडे लष्करप्रमुखांनी लक्ष वेधले. पेट्रोलिंगमुळे तुम्हाला ही प्रक्रिया करणे सोपे जाईल. दोन्ही बाजूंना एकमेकांचे मन वळवण्याची संधी मिळेल. एकदा विश्वास प्रस्थापित झाला की पुढील पाऊल उचलले जाईल, असेही ते म्हणाले.

करारात नेमके काय?

– पूर्व लडाखमधील एलएसीवरील एप्रिल 2020 मधील पूर्वस्थिती पूर्ववत करण्यास चीन आणि हिंदुस्थानमध्ये एकमत झाले आहे. म्हणजेच चिनी सैन्य आता ज्या भागात त्यांनी अतिक्रमण केले होते तेथून माघार घेणार आहे. -हिंदुस्थान आणि चीनच्या सीमावर्ती भागात गस्त घालून 2020 नंतर उद्भवणाऱया समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून यावर दोन्ही देश योग्य पावले उचलतील अशी माहिती हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिसरी यांनी दिली आहे.

– एप्रिल 2020 मध्ये लष्करी सरावानतंर चीनने पूर्व लडाखच्या 6 भागात अतिक्रमण केले होते. 2022 पर्यंत चिनी सैन्याने 4 भागातून माघार घेतली आहे. हिंदुस्थानी सैन्याला दौलत बेग ओल्डी आणि डेमचोकमध्ये गस्त घालण्याची परवानगी नव्हती.