मुंबईतील कोळीवाडय़ांचे ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ करून भूमिपुत्र कोळी बांधवांना ‘एसआरए’सारखे इमारतींमध्ये डांबण्याचा कुटिल डाव शिंदे-भाजप सरकारचा आहे. यामध्ये कोळीवाडय़ांची हजारो एकर जागा सरकारच्या कंत्राटदार-बिल्डर मित्रांच्या घशात घातली जाणार आहे. मात्र याद राखा, ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’च्या नावाखाली कोळीवाडय़ांचा लिलाव होऊ देणार नाही, अशा शब्दांत आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारला ठणकावले.
एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने कोळीवाडय़ांचा विकास क्लस्टर डेव्हलपमेंटने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नागरिकांना आणि कोळी बांधवांना हरकती-सूचना मांडण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शिंदे-भाजप सरकारच्या हाऊसिंग ड्राफ पॉलिसीची पोलखोल केली. कोळीवाडय़ांचा विकास क्लस्टर डेव्हलपमेंट या गोंडस नावाखाली ‘एसआरए’सारखाच करून भूमिपुत्रांना इमारतीत डांबण्याचा हा डाव असल्याचे ते म्हणाले. मुंबईत वरळी, कुलाबा, शीव, जुहू, मढ, खारदांडा, वर्सोवा, मार्वे, धारावी अशा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कोळी बांधव आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना कोळीवाडय़ांच्या विकासाबाबत महत्त्वाच्या बैठकाही झाल्या. सीमांकन करण्याचा निर्णय झाला. मात्र आता एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोळीवाडे बिल्डरांच्या घशात घालू पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुणाचेही ऐकत नाहीत. एकतर ते मालक अदानी पिंवा बिल्डरचे ऐकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
सरकारचा भूमिपुत्रांवर इतका आकस का?
मिठागरांच्या जमिनीवर पीएपीची घरे न बांधण्याचे गद्दार आमदारांनी पाळले नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोळीवाडय़ांमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱया विविध समाजाच्या नागरिकांनी कुठे जायचे, असा सवालही त्यांनी केला. म्हणूनची ही लढाई असल्याचेही ते म्हणाले. सरकारचा मुंबईच्या भूमिपुत्रांवर इतका आकस का, असा सवालही त्यांनी केला. आमचे सरकार आल्यावर पब्लिक कन्सल्टेशन, ग्लोबल एक्स्पर्ट कन्सल्टेशन, ग्लोबल एक्स्पर्ट कन्सल्टन्सीनुसारच आणि भूमिपुत्र, व्यावसायिक कोळी महिला यांच्याशी चर्चा करूनच कोळीवाडय़ांचा विकास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोळी बांधवांना आहे तिथेच घर देणार
कोळी बांधव राहत असलेल्या ठिकाणीच त्यांचा व्यवसाय असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. संस्कृती परंपरा जपत ते तिथेच राहत आहेत. त्यामुळे कोळीवाडय़ांच्या विकासात कोळी बांधवांना आहे त्याच ठिकाणी घर मिळायला हवे, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली. मी शब्द देतो की सगळय़ा जिह्यातल्या कोळी बांधवांचे सेल्फ रीडेव्हलपमेंट करून त्यांना जिथे आहेत तिथेच घर देणार असे ठाम आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कोळीबांधवांना क्लस्टर नाही तर स्वतःचे हक्काचे घर मिळायला हवे, असेही ते म्हणाले. यासाठी आम्ही कोळीवाडे कदापि नष्ट होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आमची सत्ता येताच पहिल्याच दिवशी पॉलिसीची होळी!
मुंबईतील कोळीवाडे अनेक एकरांत पसरले आहेत. या ठिकाणी कोळी बांधवांची प्रशस्त घरे आहेत. असे असताना क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये एका कोपऱयात भूमिपुत्र कोळी बांधवांना ‘स्क्वेअर फुटांत’ डांबून समुद्रालगतची शेकडो एकर जागा बिल्डरला देण्यात येणार असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. ही पॉलिसी सरकारने नाही तर कुठल्यातही बिल्डरने बनवली असून अन्यायकारक हाऊसिंग पॉलिसी ड्राफ्टची सत्ता येताच पहिल्याच दिवशी होळी करून रद्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी कोळी बांधवांना जबरदस्ती घराबाहेर काढण्यासाठी स्लम एव्हिक्शन फोर्स बनवली जाणार आहे. हे सरकार नक्की कुणासाठी आहे? आम्ही कोळीवाडे कदापि नष्ट होऊ देणार नाही. त्यासाठीच ही लढाई आहे!