प्रसिद्ध अर्थतज्ञ व राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांची पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून केलेली हकालपट्टी रद्द करण्यात आली आहे. डॉ. रानडे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय कुलपतींनी मागे घेतल्याचे मंगळवारी उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. त्यांच्यावर पुन्हा कारवाई केल्यास डॉ. रानडे यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाप्रमाणे बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. डॉ. रानडे यांना नियुक्तीनंतर अवघ्या दोन वर्षांतच कुलगुरूपदावरून अपमानास्पदरित्या हटवले होते.