ही मुंबई अदानीची नाही माझ्या सामान्य माणसांची आहे, त्यांचाच आवाज इथे चालणार – आदित्य ठाकरे

ज्या प्रकारे अदानीला मुंबई फुकटात दिली जातेय त्याचा मी विरोध करतोय. हा प्रश्न फक्त मुंबईचा नाही. फक्त वरळीचा नाही. तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. आपल्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, मराठी भाषेचा, संस्कृतीचा आहे. ही मुंबई अदानीची नाही माझ्या सामान्य माणसांची आहे, कामगारांची आहे, विद्यार्थ्यांची, कष्टकऱ्यांची आहे. त्यांचाच आवाज या मुंबईत चालला पाहिजे बाकी कुणाचा नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला सुनावले आहे. मुंबईतील वरळी येथे महाविकास आघाडीचा मेळावा मंगळवारी पार पडला. यावेळी या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले.

”आजच्या लढाईची गेले दोन अडीच वर्ष वाट पाहत होतो. लोकसभा निवडणूक झाली. त्यात आपण अरविंद सावंतांना निवडून दिलं. त्या निवडणूकीत समोर जो राक्षस उभा आहे. चारसो पार बोलत होता. ईडी सीबीआय सगळं सोबत असून देखील यांना कसं रोखणार असं सगळ्यांना वाटत होतं. असं असतानाही जो काही चमत्कार या देशातील जनतेने दाखवला. ज्यांना वाटत होतं की ते चारसो पार होतील ते 240 वर अ़डकले. इंडिया आघाडी देखील 237 वर आहे. ते राक्षसासारखे अंगावर येत होते. कुणी काही बोललं की घरी धाड पडायची. बुलडोजर पाठवायचे. इंडिया आघाडी एकत्र येण्याआधी संविधान रक्षणाची वज्रमूठ सभा आपल्या महाराष्ट्रातून सुरुवात केली होती. आपल्या राज्यात सर्वप्रथम संविधानाला बाजूला ठेवलं गेलं होतं. ही सत्यपरिस्थिती आहे. दोन अडीच वर्षापूर्वी जेव्हा आपलं सरकार पाडलं गेलं होतं. तेव्हा 40 गद्दार आमदार, 12 खासदार पळून गेले. हे पळून गेल्यानंतर जे सरकार स्थापन केलं ते घटनाबाह्य आहे. संविधानाचा अपमान करून ते आपल्या डोक्यावर बसवलं गेलं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

” आता निवडणूक आली आहे. मात्र निवडणूक ही निवडणूकीसारखी लढवली गेली पाहिजे. आपल्याला ही निवडणूक जिंकणं गरजेचे आहे. आपण आज ज्या भाषेत बोलत आहोत. ज्या बिनधास्तपणे फिरत आहोत. पण जर आपलं सरकार आपण आणू शकलो नाही तर हे सर्व अदानी यांची परवानगी घेऊन करावं लागले. त्यांची परवानगी घेऊन आपल्याला आपल्या भाषेत बोलावं लागेल. ज्या थाटात आपण सणवार साजरे करत होतो ते होणार नाहीत. तसं शिवसेना असताना हे आम्ही होऊ देणार नाही. पण ज्या प्रकारे अदानीला मुंबई फुकटात दिली जातेय त्याचा मी विरोध करतोय व तुम्ही देखील केला पाहिजे. हा प्रश्न फक्त मुंबईचा, फक्त वरळीचा नाही. तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. आपल्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, मराठी भाषेचा, संस्कृतीचा आहे. मुंबई मिळवायला 106 हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर आपल्याला मुंबई मिळाली आहे. त्या लढाईविषयी मी आजोबांकडून ऐकलं आहे. ते सांगायचे की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या विषयी. त्यात पहिल्या पाच नेत्यांमध्ये माझे पंजोबा होते. तीच भूमिका माझ्या आजोबांमध्ये आली, माझ्यात आली आपल्या सर्वात आली आहे. ज्या मुंबईने लोकसभेत आपल्या बाजूने निकाल दिला. खरंतर तो निकाल ५-१ असा होता. पण आपली एक सिट आपली चोरली. त्या विरोधात आपण लढतोय. हा महाराष्ट्र आपल्या हातातून जायला नको. आज आपण विचार करणं गरजेचं आहे. यांनी 40 50 रुपयांचा टोल माफ केला. एका बाजूला आपल्याला खूप मोठी सवलत मिळाली आहे असं दाखवले. पण दुसऱ्या बाजूला आपल्याला न विचारता, निवडणूका न घेता, या मुंबईचे 1080 एकर अदानीच्या समुहाच्या घश्यात फुकटात घातलेले आहेत. यात आपल्याला घरं ही मिळणार नाहीत. ही घरं आपल्याला परवडणारंच नाहीय. काही सोसायटीत तर हे सांगाय़ला लागले आहेत की मराठी भाषिक नको, मांसाहार करणारे नको. या सगळ्याला आम्ही का विरोध करतोय असं अनेकांना वाटतंय़. कदाचित आपणही सेटल होऊ शकलो असतो य़ांच्य़ाआसारखे पण आपण सेटल होऊ शकत नाही. कारण ही मुंबई अदानीची नाही माझ्या सामान्य माणसांची आहे, कामगारांची आहे, विद्यार्थ्यांची, कष्टकऱ्यांची आहे. त्यांचाच आवाज या मुंबईत चालला पाहिजे बाकी कुणाची नाही, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

”यांची धारावीची भूक कमी होत नाही. धारावी सीट देखील आपण जिंकणं गरजेचं आहे. आज तिथला लढा आपण सर्वांनी दिला आहे. जर आपल्या काळात हे टेंडर आलं असतं तर कदाचित अदानी जिंकले असते किंवा दुसरं कुणी जिंकलं असतं. धारावीचा मुद्दा नक्की काय आहे ते सांगतो. मूळ धारावी आहे तीनशे एकर. त्यात झोपड्या, मायक्रो इंडस्ट्री आहेत. त्यात पुनर्विकास करायचा असेल तर ट्रान्झिट कॅम्प लागणार म्हणून रेल्वेची म्हाडाची जागा घेतली. एकूण 540 एकर जागा अदानी समुहाला मिळतायतक. आता एकनाथ शिंदेच्या सरकारने स्टेअर केस प्रिमियम, ओपन स्पेस प्रिमियम माफ केला. बिल्डिंग बांधण्यासाठी जो टीडीआर लागतो. तो टिडीआर आता ना राज्य सरकारकडे आहे ना महापालिकेकडे आहे. तो आता अदानीकडे आहे. आता पहिले पन्नास टक्के तुम्हाला अदानीकडून घ्यावे लागतील. हे सगळे अधिकार कुणी दिले अदानीला. पन्नास टक्के द्यायचे की नाही, कुठल्या रेटला द्यायचे ते अदानी ठरवणार. त्या व्यतिरिक्त मुंबईतील मुलुंड कुर्ला, कांजूर, मढ आयलँड मध्ये अशी एकूण 1080 एकर अदानीला फुकटात दिली आहे,.. तुम्ही एक इंच तरी मुंबईचा स्वत:च्या खिशातून घेऊ शकता का नाही परवडणार. यांच्या फ्लॅटमध्ये यांची लोकं आणून बसवणार. यांना मराठी नको, ही जात नको ती नको. कोळीवाडे देखील आज त्यांनी अदानीच्या घशात टाकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मुंबईतील प्रत्येक सीट महत्त्वाची आहे. मोठे प्रस्ताव येतात ते महापालिकेत येतात नगरसेवक त्यावर चर्चा करतात नंतर त्याला मान्यता मिळते. आज नगरसेवक नाहीत. असेच सुरू असताना मुंबईतील तीन भूखंड बिल्डरला देणार आहेत. पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज मंडईचा. आपलं सरकार आल्यानंतर हा निर्णय रद्द करायचा. दुसऱ्या बाजूला वरळीतील असफॉ़ल्ट प्लॅन्ट मलबार हिलमधला बीएसी रिसिव्हिंग स्टेशन देतायत. हे तीन भूखंड परत कुणाला जातील ते सर्वांना माहित आहे. यांनी ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे यांना इथले सगळ्या कोळीवाड्यात क्लस्टर डेव्हलपमेंट करायचे. आपलं सरकार असताना कोळीवाड्याला वेगळे नियम लावून त्याचं त्याच जागी डेव्हलपमेंट करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र आता जे आता बंगल्यात राहतात. एकरात ज्यांची जागा आहे त्यांना स्क्वेअर फूटात डांबलं जाणार आहे. त्यानंतर राहिलेली मोक्याची समुद्र किनाऱ्याची जागा ती बिल्डरला दिली जाणार. हे फक्त मुंबईसाठी नाही तर जिथे जिथे गावठाण व कोळीवाडे आहेत तिथे क्लस्टर डेव्हलपमेंट होणार मिंधे सरकारने आणलेले हे क्लस्टर डेव्हलपमेंट आम्ही होऊ देणार नाही. आम्ही कोळीवाड्यांचे सेल्फ रिडेव्हलमेंट करणार. तुम्ही जिथे आहात. तिथेच तुम्हाला घरं देणार. आमचं सरकार बनवल्यानंतर आम्ही पहिल्या दिवशी ड्राफ्ट हाऊसिंगची होळी केल्याशिवाय राहणार नाही. ही सरकारने बनवलेली नाही ही त्यांच्या एक दोन बिल्डरांनी बनवलेली आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले