लोकमान्य टिळक टर्मिनसहून शालीमारला जाणाऱ्या शालीमार एक्सप्रेसचे दोन डबे नागपूरजवळ रेल्वेरुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने यात कोणतीही जीविहानी झाली नाही. अपघातानंतर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
नागपूरमधील इतवारी स्थानकाजवळ दुपारी 2 वाजता शालीमार एक्सप्रेसचे एस 1 आणि एस 2 हे दोन डबे रुळावरून घसरले. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी दिली.
प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. अपघातानंतर एक हेल्पलाइन स्थापन करण्यात आली असून, बाधित प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत, असेही सिंह पुढे म्हणाले.