चंद्रपूर जिल्ह्यातील वाघिणी आता ओडिशाचे जंगल फुलवणार आहेत. यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या दोन वाघिणी शोधल्या जात असून त्या ओडिशाला पाठवण्यात येणार आहेत. ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात वाघिणींची संख्या कमी आहे. त्यामुळे ओडिशा राज्य सरकारने वाघांच्या वाढीसाठी वाघिणींची गरज NTCA कडे व्यक्त केली होती. त्यानुसार ही गरज आता चंद्रपूर जिल्ह्यातून भागवली जाणार आहे.
ओदिशाला पाठवण्यासाठी अडीच ते तीन वर्षे वयाच्या वाघिणींचा शोध घेतला जात आहे. दोन वाघिणी पाठवायच्या असल्या तरी शोध काही वाघिणींचा घेतला जात आहे. ताडोबा कोअर, बफर आणि संरक्षित जंगलात हा शोध सुरू आहे. अजूनपर्यंत अशा वाघिणी सापडलेल्या नाहीत. जेव्हा या वाघिणी सापडतील, त्यांना लगेचच ओडिशाला पाठवण्यात येणार आहे. यापूर्वीही अशारीतीने इथले वाघ राज्यात इतरत्र पाठवण्यात आले, पण ते वाघ प्रामुख्याने हल्लेखोर होते. यावेळी मात्र इथे रमलेल्या वाघिणी पकडायच्या असून ओडिशासारख्या दूरवरच्या राज्यात सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे ओडिशा वन विभागाची जबाबदारी मोठी असणार आहे.