महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर ‘मातोश्री’वर दाखल झाले. ‘मातोश्री’वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे आणि थोरात यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप आणि काँग्रेस उमेदवारांची यादी याबाबत दिल्लीत काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सोमवारी पार पडली. याच बैठकीत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना थोरात चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हटले.
पवारांसोबत चांगली चर्चा झाली असून मार्ग निघत आहे. काही ज्या थोड्या जागा राहिल्या आहेत त्याच्यावरची ही चर्चा असून तीनही पक्षात मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला जागेचा आग्रह धरण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाकडे चांगले उमेदवार असल्याने जागेसाठी आग्रह वाढतोय. पण आमच्यात मतभेद नाहीत, लवरकर या जागांवरील मार्ग काढू, असे थोरात म्हणाले.
महाविकास आघाडीत सर्व सुरळीत असून कोणीही चिंता करू नये; संजय राऊत यांचा टोला
पवारांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. बहुतांश जागांवर एकमत झाले असून थोड्या जागांवर चर्चा सुरू असल्याचेही थोरात यांनी सांगितले. तीन वाजता महाविकास आघाडीची बैठक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आमच्यात कोणताही बेबनाव नाही. दोन-तीन पक्ष येतात तेव्हा काही प्रश्न निर्माण होतात, जागांसाठी आग्रह असतो. याला बेबनाव म्हणता येणार नाही. चर्चा चालूच असते. महायुतीची परिस्थिती आणखी वाईट असून फक्त बंद खोलीत चर्चा सुरू असते, ती बाहेर येत नाही एवढेच, असेही थोरात म्हणाले. तसेच आघाडीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून भाजपने काही बातम्या पेरल्याचा आरोपही त्यांनी केला.