झाडीत पैसे, डोंगरात पैसे, हॉटेलात पैसे; कोणाला किती टक्के? मिंधे टोळी एकदम ओक्के!

पुणे जिल्ह्यातीत खेड शिवापूर टोलनाक्याजवळ सत्ताधाऱ्यांशी संबंधित एका गाडीमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड आढळून आली. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. पैसे सापडलेली गाडी मिंधे गटातील गद्दार आमदाराची असल्याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक सूचक ट्विट केले आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सापडलेल्या या पैशांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडत आहेत. नाना पटोले यांनीही ट्विट करत सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. भ्रष्टयुतीमधील आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटी सापडले! झाडीत पैसे.. डोंगरात पैसे…हॉटेलात पैसे..कोणाला किती टक्के?
मिंधे टोळी एकदम ओक्के! असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

अंबादास दानवे यांचे ट्विट

खेड शिवापूर प्रकरणी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देऊन पळणारे अधिकारी खरं तर ऑलिम्पिकमध्ये धावायला हवेत, ते देशासाठी पदक नक्की आणतील! केवढा तो वेग!! यावरून हे स्पष्ट आहे की ही रक्कम कुठून कुठे जात होती आणि सत्ताधाऱ्यांच्या ओझ्याखाली कोण दबले आहेत. साधा पाकिटमार धरला की गावभर आपल्या कौतुकाची दवंडी देणारे पोलिस खेड शिवापूर सारख्या प्रकरणांत मूग गिळून गप्प बसणे, हा आता आचारसंहितेचा अलिखित नियमच आहे, असे ट्विट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे.