गद्दार आमदाराकडे जाणारे फक्त 5 कोटी जप्त केले; उरलेले 10 कोटी कुठे गेले? संजय राऊतांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषेदत सांगोला येथे जप्त करण्यात आलेल्या 5 कोटी रुपयांबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. पोलिसांनी दोन गाड्यामध्ये एकूण 15 कोटींची रक्कम पकडली होती. मात्र, मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून फोन आल्याने फक्त 5 कोटी जप्त केल्याचे दाखवत 10 कोटी रुपये झाडी, डोंगरातून योग्य ठिकाणी पोहचवण्यात आले आहेत. तसेच याबाबत पोलीस आणि निवडणूक आयोगाची तोंडे बंद केल्याने तेदेखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या घटनेवरून महायुतीकडून पैशांचे वाटप सुरू असल्याचे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले. तसेच जागावाटापाचा प्रश्न आज मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी काल आमची चर्चा झाली. या बैठकीनंतर शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षातील जागावाटपाबाबतचा तिढा सुटलेला आहे. आता एखादी जागा सोडल्यास आमच्यात कोणतेही मतभेद नाही. ते मतभेदही आज संध्याकाळपर्यंत दूर करण्यात येतील. दिल्लीत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आता मुंबईत आले आहेत. ते शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मातोश्री येथे ते शिवसेना ९उद्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करून मतभेद दूर केले जातील. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसून सर्व सुरळीत सुरू असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील खेड-शिवापूर मार्गावर दोन गाड्या होत्या. त्यात सुमारे 15 कोटी रुपय होते. निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या आमदारांना पुन्हा 50 खोके पाठवत आहेत. त्यातील 15 कोटींचा पहिला हप्ता त्यांना पाठवण्यात येत असल्याचे आपण याआधी सांगितले होते. सांगोलातील त्यांच्या गद्दार आमदारांना 15 कोटी पाठवण्यात येत होते. त्यातील पाच कोटींचा हिशोब दाखवण्यात आला आहे. 10 कोटी रुपये पुढे पाठवण्यात आले आहेत. दोन गाड्या होत्या. त्या आमदारांची माणसे गाडीत होती. गाड्या पकडल्यानंतर एक फोन आला आणि एक गाडी सोडण्यात आली, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. 10 कोटी रक्कम काय झाडी, काय डोंगर करत योग्य ठिकाणी पोहचवण्यात आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातील सुमारे 150 आमदारांना आतापर्यंत 15 कोटी रुपये पोहचवण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये 15 कोटी रुपये होते. अचानक 10 कोटी कोठे गेले, याबाबतची माहिती नाही. आमच्या खिशातील एक- दोन हजार रुपयेही जप्त करण्यात येतील आणि एका फोननंतर 10 कोटी असलेली गाडी सोडण्यात येते. जरीही जप्त करण्यात आलेली 5 कोटी हीदेखील मोठी रक्कम आहे. या घटनेवरून मिंधे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या गटाकडून कशाप्रकारे पैशांचे वाटप सुरू आहे, हे दिसून येते. आता 15 कोटी रुपये पोहचले आहेत. उरलेली रक्कमही पोलीस संरक्षणात आमदारांपर्यंत लवकरच पोहचणार आहेत, असेही राऊत म्हणाले.अशा घटनांकडे निवडणूक आयोगा कानाडोळा करत नसून डोळे मिटून बसले आहेत, असेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्त मते मिळालेल्या मतदारसंघात अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून वगळ्यात येत आहे. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करत भाजप हे पाप करत आहे. अशा प्रकारे यादीतून नावे वगळण्यात येत असल्याचे गंभीर आहे, असेही ते म्हणाले. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज जागावाटपाबाबतचा तिढा सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.