चिंचवड विधानसभेची जागा पक्षासाठी सोडवून घेण्याची मागणी करूनही कोणतीही चर्चा न करता भाजपला जागा सोडल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील माजी नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांचे काम करणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे जगताप यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली. चिंचवड विधानसभा मतदारसंघनिर्मितीपासून जगताप कुटुंबीयातीलच आमदार राहिला आहे. राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवडमधून लक्ष्मण जगताप एकदा अपक्ष आणि दोनदा कमळावर असे तीन वेळा निवडून आले होते.
जानेवारी 2023 मध्ये त्यांचे निधन झाल्याने पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडून आल्या. भाजपमधील माजी नगरसेवकांच्या एका गटाने जगताप कुटुंबातील घराणेशाहीला उघडपणे विरोध केला. त्यानंतरही भाजपने शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या स्वपक्षातील माजी नगरसेवकांची समजूत काढण्याचे आव्हान असतानाच, आता महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने प्रचार न करण्याची भूमिका घेऊन जगताप यांच्या अडचणीत भर घातली आहे.
पोटनिवडणुकीत 1 लाख मते घेतलेले आणि आता विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले माजी विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यानुसार माझी निवडणुकीची तयारी सुरू होती. परंतु, भाजपचा उमेदवार जाहीर झाला, त्यामुळे आम्हाला दिलेला शब्द अजित पवार यांनी पाळला नसल्याची खंत आहे. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता भाजपला जागा सोडली. आम्ही सर्व माजी नगरसेवक एकत्र आहोत. भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे हेही आमच्यासोबत आहे. महाविकास आघाडीकडून आमच्यापैकी कोणालाही एकाला उमेदवारी मिळाल्यास त्याचे सर्वजण एकदिलाने काम करणार आहोत.
प्रशांत शितोळे म्हणाले, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार असताना, पक्षाला जागा मिळाली नाही. दोन दिवसांत महाविकास आघाडीकडून चांगला निर्णय अपेक्षित आहे. तर, भाजपचे काम न करणाऱ्यावर आम्ही ठाम असल्याचे मयूर कलाटे यांनी सांगितले.
…तर पिंपरीत राष्ट्रवादीचे काम करणार नाही
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या उमेदवारांचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतला असेल तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे यांनी दिला आहे.