‘‘संविधान वाचवण्यासाठी सांस्कृतिक सत्ता ताब्यात घेणे गरजेचे आहे. देशात ज्यांच्याकडे सांस्कृतिक सत्ता असते ते राजकीय सत्ता कोणाचीही असली तरी बदल घडू देत नाहीत. त्यामुळे आपण सांस्कृतिक सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’’ असे परखड मत लोकशाहीर संभाजी भगत यांनी मांडले. दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे रविवारी पार पडलेल्या दया पवार स्मृती पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
लोकशाहीर संभाजी भगत म्हणाले की, बहुजन संस्कृतीतील भाषा, खाद्यसंस्कृती, लोकसंगीत, लोकपरंपरा, आदिम संस्कृती यांचे दस्ताऐवजीकरण करणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी दया पवार प्रतिष्ठानसारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा.
ज्येष्ठ लेखक व विचारवंत शाहू पाटोळे, पत्रकार सुकन्या शांता आणि लेखिका प्रा. आशालता कांबळे यांना या वर्षीच्या दया पवार स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर ग्रंथाली प्रकाशनच्या वतीने देण्यात येणारा ‘बलुतं’ पुरस्कार ‘सूर्य गिळणारी मी’ या आत्मकथनाच्या लेखिका अरुणा सबाने यांना अध्यक्ष संभाजी भगत आणि दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पोखरकर यांनी, तर प्रास्ताविक डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी केले. सविता प्रशांत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका प्राची माया गजानन यांचे आदिवासी संगीतावरील सप्रयोग व्याख्यानदेखील सादर करण्यात आले. नागपूरचे लेखक प्रमोद मुनघाटे यांनी लिहिलेल्या मानपत्राचे वाचन पत्रकार ऋषिकेश मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला दया पवार यांचे कुटुंबीय व सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.