माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. त्या चौघांची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले होते. 25 ऑक्टोबरपर्यंत ते पोलीस कोठडीत असतील. दरम्यान पळून गेलेल्या तिघा आरोपींचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.
बाबा सिद्दिकी यांची वाद्रय़ाच्या खेरनगर येथे दसऱयाच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या वेळी धर्मराज कश्यप आणि गुरनेल सिंह हे दोघे पोलिसांच्या हाती लागले होते. तर गोळीबार करणारा शिवकुमार गौतम हा पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर तपास पथकांनी पुण्यातून प्रवीण लोणकर तसेच यूपीला पळून गेलेला हरीश कुमार निशाद अशा दोघांना पकडले. या चौघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. हे चौघेही तपासात सहकार्य करत नाहीत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याकडून अद्याप सखोल चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. त्यानंतर न्यायलयाने चौघा आरोपींच्या कोठडीत 25 तारखेपर्यंत वाढ केली.
समाजमाध्यमावरून माहिती घेतली, रेकी केली
बाबा सिद्दिकी यांना ठार मारायचा कट शिजल्यानंतर आरोपींना बाबा सिद्दिकी यांचा पह्टो व पह्टो असलेला बॅनर पुरविण्यात आला होता. त्यानुसार आरोपींनी बाबा सिद्दिकी यांची रेकी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी आरोपींनी बाबा व जिशान सिद्दिकी यांच्या समाजमाध्यमावरील खात्यांवरून माहिती मिळवली. त्यानंतर आरोपींनी बाबा सिद्दिकी यांचे घर, कार्यालय, त्यांचे दिवसभरातील कामकाज याची माहिती आरोपींनी मिळवली होती.
जुलै महिन्यात शस्त्र आणली
बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांडात आतापर्यंत पोलिसांनी दहा आरोपींना बेडय़ा ठोकल्या आहेत. त्यातील प्रत्येक आरोपीची गुह्यात भूमिका होती. शिवकुमार, धर्मराज आणि गुरनेल हे प्रत्यक्ष गोळीबार करण्यात पुढे होते. तर अन्य आरोपींनी वेगवेगळी भूमिका बजावली. राम आणि भागवंत यांनी जुलै महिन्यात उदयपूरमध्ये जाऊन गुह्यात जप्त केलेली तीन पिस्तूल मुंबईत आणली होती. उदयपूरहून ते खासगी वाहनांनी शस्त्र घेऊन मुंबईत आले. पण उदयपूर येथे त्या दोघांना शस्त्र कोणी आणून दिली ते मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
ते तिघे हाती लागल्यावरच…
गुह्याची जबाबदारी घेणारी पोस्ट करणारा शुभम लोणकर, प्रत्यक्ष गोळ्या झाडणारा शिवकुमार गौतम तसेच या कटात सामील असलेला मोहम्मद अख्तर झिशान हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सुपारी नेमकी कोणी दिली, त्यामागचे नेमके कारण काय होते या सर्व बाबी ते तिघे हाती लागल्यानंतर स्पष्ट होतील, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते. बाबा सिद्दिकी यांची हत्या ही कॉन्ट्रक्ट किलिंगच आहे. त्यामुळे शुभम किंवा शिवकुमार हे पकडले गेल्यावर सर्व बाबीं स्पष्ट होतील, असे सांगण्यात येते.
आणखी दोन पिस्तूल सापडले?
हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या तीन पिस्तूल हस्तगत केल्या आहेत. त्यातली एक तर्किश बनावटीची, दुसरी ऑस्ट्रेलियन बनावटीची तर तिसरी देशी बनावटीची पिस्तूल होती. याव्यतिरिक्त आणखी दोन पिस्तूल सापडल्याचे समजते. मात्र त्याबाबत पोलिसांकडून अधिकृत सांगितले नाही.
कर्जतमध्ये गोळ्य़ा झाडण्याचा सराव
आरोपींनी कर्जत परिसरात गोळ्या झाडण्याचा सराव केल्याचे समजते. कर्जतमधील निर्जन स्थळी आरोपींनी गुह्यात वापरलेले पिस्तूल चालविण्याचा सराव केला होता. त्याचाही पोलीस तपास करत आहेत.