उत्तर प्रदेशमधील बहराईच येथील हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी भाजपच्या नगर अध्यक्षांसहीत सात जणांविरोधात नगर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
”जगामध्ये भाजप हाच एकमेव पक्ष असा असेल जो जातीय असो, धार्मिक असो, सर्व प्रकारच्या दंगलींमध्ये स्वतःचा फायदा पाहतो. कारण लोकांची डोकी भडकवून त्यावर आपली पोळी भाजणं एवढंच त्यांना चांगलं जमतं. उत्तर प्रदेशातील महाराजगंज गोळीबाराच्या घटनेनंतर 13 ऑक्टोबरच्या रात्री राम गोपाल मिश्रा यांचा मृतदेह हॉस्पिटल चौकात आणला तेव्हा आंदोलकांच्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतानाच, या आंदोलनाला दंगलीचे स्वरूप आले होते. दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या दंगलीबाबत खोट्या अफवा पसरवून उत्तर प्रदेश आणि संपूर्ण देशाचे वातावरण गढूळ झाले होते. आज त्या दंगलीचे सत्य समोर आले आहे. भाजप आमदाराने स्वत: एफआयआर नोंदवला आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की भाजप आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या नेत्यांनी ही दंगल घडवून आणली होती. भाजपच्या राक्षसी वृत्तीचा हा आणखी एक पुरावा.. मराठी मतदारांनी आता तरी जागे व्हावं आणि या भाजप सरकारला राज्यातून हाकलून लावावं. नाहीतर आपलाही दंगल राष्ट्र करायला भाजप मागे-पुढे पाहणार नाही”, असे आव्हाड यांनी ट्विट केले आहेत.
हरदी पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या महराजगंज येथे दुर्गामातेच्या विसर्जनावेळी डीजेवर गाणी वाजवण्यावरून दोन गटामध्ये वाद झाला होता. याच वादातून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी हवेत गोळीबार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
यादरम्यान 22 वर्षीय रामगोपाल मिश्रा याचा मृत्यू झाला. त्याच्यावर चाकूने वार केल्याचे उघड झाल्यानंतर सोमवारी पाच ते सहा हजार लोकांचा जमाव त्याच्या घरी जमला. त्यानंतर संतप्त लोकांनी 5 किलोमीटरचा मोर्चा आणि अंत्ययात्रा काढली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर कुटुंबीय मृतदेह घरी घेऊन गेले, मात्र जमावाने मागे हटण्यास नकार दिला. त्यानंतर जमावाने अचानक उग्र रुप धारण केले आणि जाळपोळ सुरू केली.
जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलीसही मागे हटले. संतप्त जमावाने गाड्या, रुग्णालय, शोरुम, घर, दुकानांना आग लावली. यामुळे पोलिसांची अधिकची कूमक मागवण्यात आली. पोलिसांनी 30 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांनाही निलंबित केले आहे.