बॉलीवूड अभिनेता सलमान खानला 5 कोटी दे अन्यथा बाबा सिद्धीकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करेन अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीला आता उपरती झाली असून त्याने माफी मागितली आहे. मेसेज करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याने हा मेसेज चूकून केला आणि त्यासाठी त्याने माफी मागितली आहे.
सध्या हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे झारखंडमधील लोकेशन पोलिसांना सापडले असून त्याच्या शोधात पोलिसांचे पथक तेथे पोहोचले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या जवळचे असल्याचे सांगितले होते आणि दावा केला की तो सलमान आणि लॉरेन्समध्ये समेट घडवून आणेल. हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर आला होता. त्यात त्याने म्हंटले होते की, अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईशी असलेले वैर संपवण्याची मागणी करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यात म्हंटले होते की, या धमकीला हलक्यात घेऊ नका. सलमान खानला जिवंत राहायचे असेल आणि लॉरेन्स बिश्नोईकडून शत्रूत्व संपवायचे असेल तर त्यांना पाच कोटी द्यायला हवे. जर पैसे नाही दिले तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट असेल, अशी धमकी सलमान खानला दिली होती.
हा मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत या अनोळखी व्हॉट्सॲप नंबर वापरकर्त्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सलमान खानला ही धमकी त्यावेळी मिळाली होती जेव्हा त्याचे मित्र बाबा सिद्दीकी यांची मुंबईत शूटर्सनी हत्या केली होती.