Team India ला अनेक वेळा चेतेश्वर पुजाराने आपल्या संयमी खेळाने कठीण प्रसंगातून बाहेर काढले आहे. मात्र टीम इंडियाकडून त्याने शेवटचा सामना मागच्या वर्षी झालेल्या World Test Championship मध्ये खेळला होता. त्यानंतर टीम इंडियाकडून खेळण्याची संधी त्याला मिळाली नाही. असे असले तरी त्याने आपला दमदार खेळ सुरू ठेवत रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगडविरुद्ध द्विशतक झळकावले असून ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राचे नेतृत्व करताना छत्तीसगडविरुद्ध चेतेश्वर पुजाराने धमाकेदार फलंदाजी करत द्विशतक झळकावले आहे. मात्र या सामन्यात शतक झळकावतच त्याने वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी खेळाडू ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे 66 वे शतक आहे. या बाबतीत ब्रायन लारा यांना पुजाराने मागे टाकले आहे. ब्रायन लारा यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 65 शतकं ठोकली आहेत. हिंदुस्थानकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधित शतकं ठोकण्याचा विक्रम संयुक्तरित्या सचिन तेंडूलकर आणि सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी प्रत्येकी 81-81 शतके झळकावली आहेत.
चेतेश्वर पुजाराने शतक झळकावताच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. त्यामुळे पुजारा आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. हिंदुस्थानकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी 25, 834 धावा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केल्या आहेत. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने या सामन्याच द्विशतक झळकावले असून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा द्विशतक झळकवणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.
सामन्यात छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 578 धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरात सौराष्ट्राने पाच गड्यांच्या मोबदल्यात 420 धावा केल्या आहेत.