शिवसेना दिल्लीसमोर झुकणार नाही! आम्ही जे करतो ते छातीठोकपणे!! अफवांचे पिक पेरणाऱ्यांना संजय राऊतांनी झोडपले

महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू असताना जाणूनबुजून अफवांचे पिक पेरले जात आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षासह प्रसारमाध्यमांनाही झोडपले. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. दिल्लीपुढे झुकणार नाही. आम्ही जे करतो ते छातीठोकपणे करतो, असे म्हणत संजय राऊत यांनी शहांच्या भेटीच्या चर्चाही फेटाळून लावल्या.

‘महाशक्तीशी सर्वात जास्त संघर्ष शिवसेनेने केला आहे. आम्ही संघर्षच केला नाही तर तुरुंगवासही भोगला. आमचा पक्ष फोडला, आमचे सरकार पाडले, आमचे चिन्ह चोरले आणि हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. हा संघर्ष आता अशा टोकाला आला आहे की कुणी अशा शंका घेत असतील तर ते एका बापाची अवलाद नाही. आमच्यावर शंका घेणाऱ्या एकतर त्यांचा बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावे. स्वत:च्या स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानावर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. समोर येऊन लढा, अफवा पसरवू नका. अफवा पसरवून लढणार असाल तर महाराष्ट्रात राजकारण करण्याचा त्यांना अधिकार नाही’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

‘ज्या कुणी या बातम्या पसरवल्या असतील किंवा कुणी सुपारी दिली असेल तर त्यांची इत्थंभूत माहिती आमच्याकडे आलेली आहे. आमचीही एक यंत्रणा आहे, एक वेगळे पेगॅसस आहे. कोण कुणाला बातम्या पुरवतेय, कोण कुणाला अफवा पसरवायला मदत करतेय हे सगळे आमच्याकडे आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणे म्हणजे औरंगजेब-अफजलखानाशी हातमिळवणी करणे’, असेही राऊत म्हणाले.

‘प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वृत्तवाहिन्या कोणतीही शहानिशा न करता बातम्या दाखवत असून मीडियावर महाराष्ट्रातील शत्रूंचे नियंत्रण आहे’, असा आरोप राऊत यांनी केला. तसेच आमच्यावरती कोणत्याही बातम्यांचा दबाव येत नाही. आमचे मन साफ आहे, आमचा विचार स्वच्छ आहे. आम्ही दबावाखाली येत नाही, आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही छातीठोकपणे करतो, असेही राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेना आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे भाजपचे षडयंत्र; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

जागावाटपाबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, ‘चर्चेअंती 210 जागांवर आमचे एकमत झाले आहे. हा फार मोठा आकडा आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र राहायला पाहिजे. संविधानविरोधी शक्तींचा, महाराष्ट्र लुटणाऱ्या शक्तींचा, महाराष्ट्राच्या दुष्मनांचा, महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्या शाह्यांचा पराभव आम्ही एकत्र राहून करू.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)