धोनीच्या नेतृत्वात पदार्पण, 4 धावांत 6 विकेट्स घेतल्या; पण एका ओव्हरने घात केला अन् खेळाडूची कारकीर्दच संपली

क्रिकेट इतिहासात टीम इंडियाला अनेक महान खेळाडू मिळाले आहेत. या खेळाडूंनी विश्वस्तरावर देशाचा झेंडा अभिमानाने फडकावला. कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, महेंद्रसिंह धोनी ही काही त्यापैकी निवडक नावे. यांची कारकीर्द आणि क्रिकेटसाठीचे योगदानही मोठे राहिले. मात्र काही खेळाडू अचानक आले तसे गायबही झाले. यापैकीच एक म्हणजे स्टूअर्ट बिन्नी.

बीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टूअर्ट बिन्नी याने धोनीच्या नेतृत्वाखाली 2014-15 मध्ये पदार्पण केले होते. कसोटीतील पहिला सामना तो इंग्लंड, वन डेचा पहिला सामना न्यूझीलंड, तर टी-20 चा पहिला सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळला. मात्र त्याची कारकीर्द छोटीशी राहिली. 2016 मध्ये तो आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले. त्यामुळे 2021 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

स्टूअर्ट बिन्नीच्या नावावर वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम आहे. 2014 मध्ये त्याने बांगलादेशविरुद्ध खेळताना फक्त 4 धावा देऊन 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. हा विक्रम आजही अबाधित आहे.

एका ओव्हरने केला घात

2016 मध्ये हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज संघात टी-20 मालिका खेळली गेली. या मालिकेत स्टूअर्ट बिन्नीच्या एकाच षटकामध्ये सलग 5 षटकार लगावण्यात आले होते. वेस्ट इंडिजचा बॅटर एविन ल्युईस याने बिन्नीच्या एकाच षटकात 5 षटकार ठोकत 32 धावांची लयलूट केली होती. हेच षटक बिन्नीचे शेवटचे आंतरराष्ट्रीय षटक ठरले. त्यानंतर त्याला कायमचा डच्चू देण्यात आला.

कारकीर्द

स्टूअर्ट बिन्नीने हिंदुस्थानकडून 6 कसोटी, 14 वन डे आणि 3 टी-20 सामने खेळले. यात त्याने अनुक्रमे 194, 230 आणि 35 धावा केल्या, तर 3, 20 आणि 1 विकेट्स घेतली.