महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान, संध्याकाळपर्यंत मार्ग निघणार

महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून याच संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेससोबत एखाद दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद नाहीत. एकाच जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगू शकतात. आज संध्याकाळपर्यंत यातून मार्ग निघेल. कदाचित तीन पक्षाच्या जागावाटपाच्या याद्या आणि फार्म्यूलाही संध्याकाळपर्यंत जाहीर करू, असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दिल्लीत आहेत. कारण तो राष्ट्रीय पक्ष असून त्यांचे सगळे निर्णय दिल्लीत होतात. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची निवडणूक होत असून काँग्रेसच्या बैठका दिल्लीतच होतात. त्यामुळे काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन हायकमांडला भेटतात यात चुकीचे काही नाही, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे असेही म्हणाले की, एखाद्या भागावर एखाद्या पक्षाचा प्रभाव नक्कीच असतो, पण कोणताही विभाग हा एखाद्या पक्षाचा नसतो. कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात शिवसेनेचा प्रभाव आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस नगण्य आहे. काही जागांवर त्यांची ताकद नक्कीच आहे. वर्ध्यात त्यांचा खासदार असून काही ठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीत जागावाटपासंदर्भात क्लॅश होण्याचा प्रश्न येत नाही. काँग्रेसशीही एकाद दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद नाहीत. त्यावर आज संध्याकाळपर्यंत मार्ग निघेल, असेही राऊत म्हणाले.

भाजपने पहिली यादी जाहीर करून फार मोठा तीर मारला असे नाही. यातील बहुसंख्य उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. आम्ही आमच्या आमदारांना ‘गो अहेड’ म्हटलेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या हक्काच्या जागेवरील आमदारांना आणि उमेदवारांना ‘मातोश्री’वर बोलवून कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. शिवसेनेच्या कामाची हीच पद्धत आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले. तसेच काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झाली. मी, अनिल देसाई, प्रवीण महाले, जयंत पाटील, सुप्रिया सुळे असे आम्ही एकत्र बसून शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये जागावाटपासंदर्भात जे काही थोडेफार विषय होते त्याबाबत चर्चा केली, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

जागावाटपासंदर्भात आमचा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याशी संवाद सुरू आहे. काँग्रेस हायकमांड समंजस भूमिका घेणारी संस्था आहे. झारखंडमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षात मतभेद आहेत. निवडणुकीच्या आधी जागावाटपात थोडेफार राग, लोभ, रुसवे होत असतात. शेवटी आम्हाला एकत्रच निवडणुका लढायच्या आहेत. जेव्हा एकत्र निवडणुका लढतो तेव्हा प्रत्येकाला एक पाऊल मागे किंवा पुढे करावे लागते, असेही राऊत म्हणाले. तसेच कोल्हापूर, रामटेक, अमरावती प्रमाणे आमच्या हक्काच्या जागा कुणी प्रेमाने घेत असेल आणि आम्ही देत असू, तर त्याच प्रेमाने काही जागा आम्हाला मिळाव्या असे जर आम्ही म्हणालो तर कुणाला वाईट वाटू नये, असेही ते म्हणाले.