Maharashtra election 2024 – भाजपने आमदार तापकीर, कांबळेंना लटकवले; कसबा गुलदस्त्यात, चिंचवडमध्ये भावजईऐवजी दिराला संधी

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत इच्छुक माजी नगरसेवकांना लांब ठेवत कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघांतील विद्यमान आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर, चिंचवड मतदारसंघात आमदार अश्विनी जगताप यांचा पत्ता कट करून त्यांचे दीर शंकर जगताप यांची वर्णी लावली असून, भोसरीतही आमदार महेश लांडगे यांना आणि दौंडमधून राहुल कुल यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, पुण्यातील खडकवासला व कॅण्टोन्मेंटमधील विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि सुनील कांबळे यांना लटकविले असून, आता या ठिकाणी नवीन उमेदवार देण्याचे संकेत यातून दिल्याची चर्चा आहे. तर, कसबा मतदारसंघातही यावेळी भाजपकडून नवा चेहरा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने विद्यमान आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सध्या पाच मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. शहरातील पाचपैकी तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहरात विधानसभेसाठी अनेक माजी नगरसेवक इच्छुक आहेत. मात्र, पहिल्या यादीवरून तरी माजी नगरसेवकांना विधानसभेसाठी स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मंत्री चंद्रकांत पाटील यांना दुसऱ्यांदा भाजपने संधी दिली आहे. मात्र, भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडमध्ये त्यांच्या उमेदवारीला आव्हान देत आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी पक्षाकडे केली होती. बालवडकर यांनी कोथरूडमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले होते. बालवडकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या घरी जाऊन आले होते. मात्र, आता चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे बालवडकर नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मिंधे-दादांना गॅसवर ठेवून भाजपची यादी, पहिल्या यादीत फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासह 99 उमेदवार

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातदेखील विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपला अगदी कमी लीड मिळाले होते. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार बदलणार, अशी चर्चा होती. मात्र, भाजपने पुन्हा सिद्धार्थ शिरोळे यांना संधी दिली असली, तरी भाजपला या मतदरासंघात खूप कष्ट घ्यावे लागण्याची चिन्हे आहेत. तर, पर्वती विधानसभा मतदारसंघामधून सलग तीन वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना भाजपने चौथ्यांदा संधी दिली आहे.

पर्वती, कोथरूडमध्ये नाराजीचे फटाके

पर्वती मतदारसंघातून माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर हे माजी नगरसेवक इच्छुक होते. दोन्ही माजी नगरसेवकांनी मतदारसंघात जागोजागी फ्लेक्स लावत रिक्षांवर बॅनर्स लावले होते. मात्र, शिळीमकर नंतर रेसमधून मागे पडले; पण भिमाले माघार घेण्यास तयार नसल्याने भाजपने महामंडळावर नियुक्ती देत आमदारकीच्या रेसमधून पत्ता कट केल्याची चर्चा होती. अखेर भिमाले यांचा पत्ता कट झाल्यानंतर मी लढणारा कार्यकर्ता आहे, रडणारा नाही. येत्या दोन दिवसांत नागरिक, कार्यकर्ते, कुटुंबीयांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात भिमाले यांची काय भूमिका असणार, हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे. तसेच कोथरूडमधून डावलल्यानंतर आता माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

खडकवासला, कसबा, कॅण्टोन्मेंटमध्ये धाकधूक

पहिल्या यादीत भाजपकडे असलेल्या खडकवासला, कसबा, पुणे कॅण्टोन्मेंट मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर न केल्याने धाकधूक कायम आहे. खडकवासला मतदारसंघ आणि पुणे कॅण्टोन्मेंट मतदारसंघाच्या भाजपच्या विद्यमान आमदारांना उमेदवारीला पक्षांतर्गत विरोध असल्याचे बोलले जात आहे. तर, कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाने ब्राह्मण उमेदवार देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांत नवीन चेहरे पाहायला मिळतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.