ऑनड्युटी महिला पोलिसांची कुचंबणा थांबणार; ठाण्यात पोलिसांच्या जुन्या पिंजऱ्यात सुसज्ज रेस्टरूम, वॉशरूमची व्यवस्था

फोटो प्रातिनिधीक

बंदोबस्त, व्हीआयपी सुरक्षा किंवा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान ठाण्यातील महिला पोलिसांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हीच बाब वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच पोलिसांच्या जुन्या, वापरात नसलेल्या पिंजऱ्यात रेस्टरूम, वॉशरूम तसेच चेजिंग रूम यांसारख्या सुसज्ज अशा मिनी व्हॅन तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता ऑनड्युटी महिला पोलिसांची कुचंबना थांबणार असून लवकरच हा प्रकल्प अमलात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

महिला पोलिसांना जादा शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे. विशेषतः धार्मिक बंदोबस्त, व्हीआयपी दौऱ्यांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने महिला पोलिसांना याचा त्रास होत होता. गर्दीच्या ठिकाणी शौचालये, कपडे बदलण्याच्या जागा आणि आराम करण्यासाठी आवश्यक जागांचा अभाव लक्षात घेता महिला पोलिसांमध्ये नाराजी होती. त्यानुसार महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा करण्याच्या दिशेने ठाणे पोलीस आयुक्तालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ठाणे पोलीस आयुक्तांनी जुन्या पीसीआर वाहनांमधून सुसज्ज मिनी व्हॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

जुन्या पिंजऱ्याचे ‘विश्रामिका’ नामकरण
महिलांसाठी खास बनवण्यात येणाऱ्या जुन्या आणि वापरात नसलेल्या पिजऱ्यांचे ‘विश्रामिका’ असे नामकरण करण्यात येणार आहे. त्याचे डिझाईन लवकरच तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक व्हॅनमध्ये एका वेळी दोन महिला पोलीस आराम करू शकतील, अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी एका खासगी बँकेकडून सीएसआर निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत घेतली जाणार आहे.

महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यादरम्यान थोडा दिलासा मिळणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांची प्रथमच शारीरिक, मानसिकतेची काळजी घेतली जाणार आहे.
– आशुतोष डुंबरे, ठाणे पोलीस आयुक्त.