महागाईच्या भडक्याने ‘होममिनिस्टर’चे किचन कॅबिनेट कोलमडले; बहिणींना दीड हजार दिले, फोडणीला तीन हजार गेले

विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून खोके सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली असून त्याचा मोठा गाजावाजा केला जात आहे. मात्र एकीकडे बहिणींना दीड हजार रुपये दिले जात असतानाच दुसरीकडे महागाईचा भस्मासूर ‘ताटात’ वाढून ठेवला आहे. सरासरी 100 रुपयांना मिळणारे खाद्यतेल दीडशे रुपयांवर गेले आहे. डाळी, रवा, मैदा, साखर, तूप तसेच अन्य कडधान्यदेखील किलोमागे 15 ते 20 रुपये दराने वाढले आहे.

भाज्यांनीही ठोकलेले शतक कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ‘होममिनिस्टर’चे किचन कॅबिनेट कोलमडले असून बहिणींवर दीड हजार घेऊन फोडणीला तीन हजार रुपये मोजण्याची वेळ आली आहे. खोके सरकारच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्यांना घर चालवताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दिवाळीचा सण तोंडावर

आल्यानंतर लाडक्या बहिणींना आता महागाईच्या झळा प्रकषनि बसू लागल्या आहेत. धान्य, तेल, डाळी, रवा, मैदा आणि तुपाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. भाजीपाल्याचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मान्सूनच्या पावसाबरोबर परतीच्या पावसाचाही मुक्काम वाढल्यामुळे शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्याचाही विपरीत परिणाम आता महागाईवर झाला आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांवर डोळा ठेवून मिंधे सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण’ ही योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात महिन्याला दीड हजार रुपये टाकण्यास सुरुवात केली. मात्र महागाई कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे दीड हजार रुपये नेमके कुठे खर्च होतात याचाच हिशेब महिलांना लागत नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने गृहिणींचे किचन बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

दीड हजार देण्याऐवजी महागाई कमी करा

महाराष्ट्र सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेचे दीड हजार देण्याऐवजी महागाई कमी केली असती तर बरे झाले असते. गॅस महागल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. सरकारकडून दीड हजार मिळतात, किचनचे बजेट त्याच्या तीन पटीने वाढले आहे, अशी प्रतिक्रिया उंबरवाठी येथील गृहिणी कमल पारधी यांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीचा फराळ करायचा कसा?

खाद्यतेल, रवा, बेसन, हरभरा डाळीचे दर भडकले आहेत. दोन हजार रुपयांत होणाऱ्या बाजाराला चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. दर वाढल्याने दर महिन्याच्या घरखर्चात दोन ते अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ करायचा कसा, असा प्रश्न सर्वसामान्य गृहिणींना पडला आहे. उत्पन्न आहे तितकेच आहे. मात्र महागाईचा आलेख वाढतच असल्याने कुटुंब चालवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे, अशी नाराजी धसई येथील गृहिणी सुमन विशे यांनी व्यक्त केली आहे.