जिथे ताकद आहे तिथे उमेदवार उभे करणार, अशी डरकाळी फोडत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उमेदवार नसतील तिथे पाडापाडी करून मराठा समाजाला संपविण्याचा विडा उचलणाऱयाला संपवणारच, असा इशाराही त्यांनी फडणवीस यांना दिला. दरम्यान, एससी, एसटीसाठी राखीव मतदारसंघात उमेदवार देणार नाही. मात्र 288 पैकी लढण्याचे मतदारसंघ तीन दिवसांत जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. आंतरवाली सराटीत आज रविवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत समाजाची बैठक बोलावली होती. ते म्हणाले की, मराठय़ांची मान आजपर्यंत कधीही खाली होऊ दिली नाही. यापुढेही समाजाची उंची कायम ठेवा, काही झाले तरी मराठा समाज संपला नाही पाहिजे. निवडणुका येतील-जातील, आपल्याला हट्ट करायचा नाही. निवडणुकीसाठी समाज तुटायला नको. उमेदवार उभे करायचे की पाडायचे असे विचारता लोकांनी हात वर करून लढायचे सांगितले. उमेदवार उभे करण्यासाठी किंवा पाडापाडीसाठी समाजाची एकजूट कायम ठेवा. मला आणि समाजाला उघडे पाडू नका. उघडे पडल्यावर जात संपेल असेही ते म्हणाले.
एससी, एसटी राखीव जागांवर उमेदवार नाही
मुस्लिम, एससी आणि एसटीच्या जागा आहेत. तिथे उमेदवार उभा न करता आपल्या विचाराच्या उमेदवाराला लाखभर मतदान देऊन निवडून द्या, असे ते म्हणाले. जिथे आपण उमेदवार उभा करणार नाही, जिथे उमेदवार उभे करायचे नाहीत तिथे आमच्या विचाराशी साधर्म्य असलेल्या उमेदवार जो 500 रुपयांच्या बॉण्डवर मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे, असे लिहून देईल त्याला निवडून देऊ. अन्यथा त्याला पाडू, अशी भूमिका त्यांनी मांडली.
समीकरण जुळवणे महत्त्वाचे
कुठे मराठय़ांची ताकद आहे ते गणित पाहणे व समीकरण जुळवणे महत्त्वाचे आहे. मी समीकरण जुळवतोय. नाही जुळलं तर अवघड आहे. संमिश्र ताकद ठेवली तर मराठा जिंकू शकतो. एक कोपरा धरून चाललो तर लढणे जिकिरीचे होईल म्हणून काही निवडून आणू, काही पाडू. 36 मतदारसंघ असे आहेत तिथे मराठाच निवडून आणू शकतो. त्यामुळे समीकरण नाही जुळलं तर ज्याने मराठय़ांना संपवले आहे, त्याला संपवायचं हे धोरण कायम असणार असा इशारा त्यांनी दिला.
समाजासाठीच ही भूमिका
ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे. त्यांनी भरा, पण 29 ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणचे अर्ज मागे घ्या. कुणाचा अर्ज ठेवायचा आणि कुणी काढायचा हे जाहीर केले जाईल. ज्याने सांगूनही अर्ज मागे घेतला नाही, त्याने पैसे खाल्ले असे जाहीर केले जाईल. कोणत्या मतदारसंघात लढायचे याचे अंतिम चित्र 23 ऑक्टोबर रोजी जाहीर करू. एका जातीवर लढून उमेदवार निवडून आणणे सोपे नाही. परंतु पाडापाडी करणे सोपे आहे. सावधगिरीची भूमिका म्हणून समाजाचे मन मोडायचे नाही म्हणून निवडणूक लढणार असल्याचे जरांगे म्हणाले.
फडणवीसांनी लेकरांचं वाटोळं केलं
इंग्रज तरी बाहेरचे होते, देवेंद्र फडणवीसांइतका क्रूर माणूस पाहिला नाही. आई-बहिणींचे डोके फोडले. आम्हाला संपवायला निघाले होते. आता आम्ही त्यांना संपवण्यासाठी तयार आहोत. कुठलीही समिती नाही, अहवाल नाही, आंदोलन नाही तरीही इतर जाती आरक्षणात घातल्या. इतका फडणवीस यांना मराठाद्वेष आहे. त्यांनी आमच्या लेकरा-बाळांचं वाटोळं केलं असे नमूद करताना आपल्याला संपविण्यासाठी निघालेल्यांना संपवा, असे आवाहन जरांगे यांनी केले.