विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बोगस मतदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून सुरू असल्याचा आरोप होत आहे. अशातच मुंबई उच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाच्या हतबलतेवर थेट बोट ठेवले आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता खूप उशीर झालाय. निवडणुकीच्या तोंडावर आता तुम्ही स्वतःहून बोगस मतदार शोधू शकत नाही, तरीही ठोस पावले उचलून या विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान रोखा व निवडणूक पारदर्शकपणे होईल याची काळजी घ्या, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने आयोगाला खडसावले. पुढच्या निवडणुकीपर्यंत तरी डुप्लिकेट मतदार शोधून योग्य ती कारवाई करा, असे आदेशही न्यायालयाने दिले.
जळगावच्या मुक्ताईनगर मतदारसंघात 43 हजार बोगस मतदार यादीत घुसवल्याचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आहे. यावर सुनावणी झाली असता न्यायालयाने यावर चिंता व्यक्त करत राज्यातील सर्वच मतदारसंघातील बोगस मतदार शोधून कारवाई होणे आवश्यक असल्याचे आयोगाला सांगितले.
एका व्यक्तीकडे दोन मतदान ओळखपत्रे असणे हा गुन्हाच आहे. स्थलांतरीत व मृतांची नावे मतदार यादीतून काढली जातात. त्याचप्रमाणे दोन ओळखपत्रे असलेल्यांची नावे यादीतून काढायला हवीत. पुढच्या निवडणुकीपर्यंत ही कार्यवाही निवडणूक आयोगाने करायला हवी, असेही न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठाने यासंदर्भातील याचिकेच्या सुनावणीवेळी नमूद केले.
…तरच बोगस नावे डिलीट करू
मतदारांचे पह्टो न देताच मतदार यादीत दोनदा नावे असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. पण संबंधित अधिकाऱयाने मतदाराचे यादीत दोनदा नाव असल्याचा निष्कर्ष नोंदवला तरच ते यादीतून डिलीट केले जाते. त्यासाठी रितसर प्रक्रिया करावी लागते, असा दावा तहसीलदारांनी केला आहे.
म्हणून नावे काढली नाहीत
मतदार यादीत दोनदा नाव असल्यास 7 नंबरचा फॉर्म भरून देणे बंधनकारक असते. 43 हजार नावे दुबार होती. त्यामुळे तितकेच फॉर्म भरून दिले पाहिजे होते. ते न दिल्याने प्रशासनाने दुबार नावे डिलीट करण्याची कारवाई केली नाही. प्रशासनाची ही भूमिका योग्यच होती, असा अजब युक्तिवाद यावेळी निवडणूक आयोगाकडून करण्यात आला.
एकाच व्यक्तीकडे दोन मतदार ओळखपत्रे असणे हा गुन्हाच आहे. अशा मतदारांची नावे यादीतून वगळा.
बोगस मतदान रोखण्यासाठी तंत्रज्ञान शोधा
मतदार नोंदणी डिजिटल आहे. सर्व प्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने राबवली जाते. मग बोगस मतदान रोखण्यासाठीही काहीतरी तंत्रज्ञान शोधा, असेही न्यायालयाने आयोगाला सांगितले आहे.
काय आहे प्रकरण
मुक्ताईनगरातील एकापेक्षा अनेक नोंदी असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकावीत यासाठी पेंद्रीय व राज्य निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. जिल्हास्तरावरील या नोंदी शोधण्यासाठी योग्य ती सामग्री द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
बोगस मतदानाची शक्यता
तब्बल 43 हजार जणांची नावे मतदार यादीत दोनदा नोंदवली गेली आहेत. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस नावे शोधण्यासाठी एका अधिकाऱयाची नेमणूक करून त्याला टॅबसह अन्य सुविधा द्यायला हव्यात, अशी मागणी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने कोर्टात याचिका करण्यात आली.
चंद्रपुरातील राजुरामध्ये मतदार यादीत 7 हजार बोगस नावे; प्रशासनाचीच तक्रार
चंद्रपूरच्या राजुरा मतदारसंघात 6853 बनावट नावे मतदार यादीत घुसवण्याचा प्रयत्न मतदारांच्या ऑनलाइन नोंदणी दरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजुरा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून वोटर हेल्पलाइन अॅप किंवा एनव्हीएसपी पोर्टलच्या माध्यमातून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा गैरवापर करून बनावट नावे मतदारयादीत घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाइन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावांवरून दिसून येत आहे.
बावनकुळे या कारस्थानाचे सूत्रधार!
राज्यातील दीडशे मतदारसंघ ठरवून एका अॅपच्या माध्यमातून दहा हजार मते काढून टाकून त्या ठिकाणी बोगस मतदार नोंदणी होत आहे. या कटकारस्थानाचे मुख्य सूत्रधार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. त्यासाठी त्यांनी नागपुरात विशेष शिबीर घेतले होते, असा आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केला.
तुळजापूर मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी उघड; 40 जणांवर गुन्हा दाखल
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस नवमतदार अर्ज नोंदणी प्रकरणात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने 40 जणांवर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच होता. तसेच आधारकार्डवरील डिजिटल सहीमध्ये दिनांक आणि वेळही समान असल्याचे आढळून आले आहे. वास्तव्याचे पुरावेही बोगस आढळले आहेत. याप्रकरणी आधी सायबर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर तो तुळजापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या बोगस मतदार नोंदणी रॅकेटमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.