मतांसाठी मिंध्यांकडून अल्यसंख्याकांसमोर लोटांगण, तीर्थदर्शन येजनेत हाजी अली, हाजी मलंगचा समावेश

विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांची मते मिळावीत यासाठी मिंधे सरकारला अखेर अल्पसंख्याकांसमोर लोटांगण घालावे लागले. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’त सरकारने मुस्लिम बांधवांच्या हाजी अली, हाजी मलंग आणि दिवाणशहा दर्ग्याबरोबरच बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन धर्मीयांच्याही नव्या तीर्थस्थळांचा समावेश केला आहे.

14 जुलै रोजी सामाजिक न्याय विभागाने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ जाहीर केली होती. त्यात राज्यातील 66 आणि देशातील 73 सर्वधर्मीय धार्मिक स्थळांचा समावेश आहे. परंतु मुस्लिम बांधवांच्या अजमेर दर्गा सोडून कोणत्याही तीर्थस्थळाचा समावेश नव्हता. हाजी अली, हाजी मलंग आणि दिवाणशहा दर्गा या मुस्लिम बांधवांच्या पवित्र तीर्थस्थळांचाही या योजनेत समावेश केला जावा अशी मागणी सपाचे आमदार रईस शेख यांनी सरकारकडे केली होती. त्या पत्राला मिंधे सरकारने प्रतिसाद दिला नाही. मात्र निवडणूक तोंडावर येताच अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी आता तीर्थस्थळांची यादी वाढवली गेली, असा आरोप होत आहे.