तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे खासगी वाहनतळावर पूजासाहित्याच्या दुकानावर वाहने लावण्याच्या कारणावरून आज सायंकाळी दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेत सातजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या प्रकरणात मोठा जमाव एकमेकांविरुद्ध चालून गेल्याने घबराट निर्माण झाली होती. शनिशिंगणापूर पोलिसांनी घटनास्थळी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमाव मोठय़ा प्रमाणात एकत्र आल्याने पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला.
सध्या शनिशिंगणापुरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, याप्रकरणी दोन्ही गटांवर उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या हाणामारीत दोन्ही गटांचे सात ते आठजण जखमी झाले. हातात काठय़ा व धारदार हत्यारांचा वापर झाल्याने शनिशिंगणापुरात पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या हाणामारीतील काहीजण यापूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.