विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी, नाशिक भाजपमध्ये गटबाजी उफाळणार

बाबासाहेब गायकवाड, नाशिक

अन्य इच्छुकांच्या मागणीचा विचार न करता भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीत नाशिकमधील विद्यमान आमदारांनाच संधी दिली आहे. यामुळे अन्य इच्छूक नाराज झाले असून, गटबाजी आणखी उफाळण्याची शक्यता आहे.

अंतर्गत गटबाजी उफाळण्याची भीती

नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे ह्या गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत येथे महाविकास आघाडीलाच आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडी येथे भक्कम असल्याची खात्री झाल्याने भाजपाने फरांदे यांना प्रतिक्षेत ठेवले आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास अंतर्गत गटबाजी उफाळेल अशी भीती पक्षाला आहे. नव्या चेहऱ्याच्या शोधात भाजपा असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघातून तिसऱ्यांदा संधी देण्यात आलेल्या आमदार सीमा हिरे यांच्याविरुद्ध सर्व इच्छूक माजी नगरसेवक एकत्रित झाले होते. हिरे सोडून कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी या सर्वांनी केली होती. विरोध करणाऱ्यांपैकी बहुतांश इच्छुक हे मूळ भाजपेयी नसल्याचा विचार करीत त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून हिरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपा अन्य पक्षातून आलेल्यांना दुय्यम वागणूक देत असल्याची भावना आता या इच्छुकांमध्ये निर्माण झाली आहे.

चांदवड-देवळा मतदारसंघात आमदार राहुल आहेर आणि केदा आहेर या दोन भावांमध्ये चुरस आहे. केदा हे लढण्यावर ठाम असल्याने राहुल यांनी त्यांच्या नावाची शिफारस पक्षश्रेष्ठाRकडे केली होती. आपण माघार घेत असल्याचे राहुल आहेर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. असे असतानाही पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांनाच उमेदवारी दिली. भावाचे नाव जाहीर करताना दुसरीकडे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी डॉ. राहुल यांनी पक्षात दबाव वाढवून फिल्डींग लावली होती, त्यात ते यशस्वी झाले. पक्षातूनही त्यांनी सहानुभूती मिळविली, भाऊ केदा यांची कोंडी केली, अशी चर्चा सुरू आहे. केदा आहेर यांना शांत करण्यात भाजपा व राहुल आहेर यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

दिनकर पाटील लढणारच

नाशिक पश्चिममधून सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथून आपण लढणारच, असे भाजपाचे महापालिका माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सांगितले. कार्यकर्त्यांची बैठक घेवून लवकरच निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक पूर्वमधून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, माजी महापौर बाळासाहेब सानप यांनी तयारी केली होती. त्यांना डावलून दुसऱ्यांदा आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ढिकले यांच्या अडचणी वाढल्या आहेत.