खते व शेतीविषयक औषधे निर्माण करणाऱया कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पुणे येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱयासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी आज रंगेहाथ पकडले.
दत्ता नारायण शेटे (वय 42, तंत्र अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण, नेमणूक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, पुणे) आणि प्रमोद वाल्मीक सुरवसे (वय 39, रा. हरिहर महाराज मठाजवळ, पंढरपूर) अशी संशयितांची नावे आहेत.
पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील दत्ता शेटे यांनी जळोली (ता. पंढरपूर) येथील तक्रारदार यांच्या खते व शेती औषधे कंपनीत धाड टाकून तेथील सॅम्पल घेतले होते. यानंतर कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम स्वीकारून गाडीमध्ये ठेवली होती. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी वाहनांची झडती घेतली असता, त्यामध्ये 50 हजार रुपयांव्यतिरिक्त इतर रक्कम सापडली. एकूण रक्कम सहा लाख 14 हजार रुपये जप्त करण्यात आली आहे.
पुणे येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार अतुल घाडगे, सलीम मुल्ला, कॉन्स्टेबल स्वामीराव जाधव, चालक राहुल गायकवाड यांनी ही कारवाई केली.