सूरज चव्हाण स्मार्ट मुलगा; अभिजीतकडून कौतुक
‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चा रनरअप अभिजीत सावंतने विजेता सूरज चव्हाणचे कौतुक केले. सूरज हा सर्वांना खूप साधा वाटत होता, परंतु मला तो सुरुवातीपासून स्मार्ट वाटला. सूरज खरंच खूप स्मार्ट मुलगा आहे. त्याला माहिती होते की, तो शोमध्ये काय करत आहे, अशा शब्दांत अभिजीत सावंतने सूरजचे कौतुक केले. सूरज चव्हाणचा 19 ऑक्टोबरला वाढदिवस होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिजीतने सूरजला व्हिडीओ कॉल केला.
मुकेश अंबानी दर्शनासाठी बद्रीनाथ-केदारनाथमध्ये
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज बद्रीनाथ आणि केदारनाथचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी ब्रदीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष यांची भेट घेत पाच कोटी रुपये मंदिरासाठी दान केले. मुकेश अंबानी यांनी रविवारी सकाळी 9 वाजता बद्रीनाथ मंदिरात पूजा केली. मंदिर समितीच्या अधिकाऱयांनी अंबानी यांचे स्वागत केले. मुकेश अंबानी हे दरवर्षी आपल्या कुटुंबासमवेत बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धामला पोहोचतात.
बाबा विश्वनाथ मंदिरातील दर्शन आता स्वस्त दरात
बाबा विश्वनाथ धामच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना सहज दर्शनासाठी आता 300 रुपयांऐवजी केवळ 250 रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे, तर 200 ग्रॅमचे लाडू आता फक्त 120 रुपयांत मिळणार आहे. बाबा विश्वनाथ धामच्या व्यवस्थेत दोन मोठे बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्टचे सीईओ विश्वभूषण मिश्रा यांनी दिली. मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली नाही.
पद्मनाभ स्वामी मंदिरातील भांडी चोरणाऱ्या चार चोरटय़ांना अटक
केरळमधील प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातील भांडी चोरणाऱया चार आरोपींना अखेर पोलिसांनी अटक केली. प्राचीन मंदिरात पूजा आणि अनुष्ठांसाठी केल्या जाणाऱया उरली या पारंपरिक भांडय़ांची चोरी करण्यात आली होती. अटक करण्यात आरोपींमध्ये एक डॉक्टर असून त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व आहे. भांडय़ाच्या चोरीची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली होती.
पुणे-जोधपूर फ्लाइटला बॉम्बची धमकी
पुण्याहून जोधपूरला जाणाऱया इंडिगो फ्लाइट 6 ई-133 या फ्लाईटला रविवारी दुपारी बॉम्बची धमकी देण्यात आली. या धमकीनंतर फ्लाईटचे इमर्जन्सी जोधपूर एअरपोर्टवर लँडिंग करण्यात आले. धमकी मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दल, श्वानपथक, पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱयांसह आपत्कालीन पथकेही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विमानातील प्रवाशांना सुरक्षित उतरवण्यात आले.
आजपासून फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल
फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल आजपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्स, लॅपटॉप, टॅबलेट्स आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर आकर्षक सूट मिळणार आहे. बिग बिलियन डेज सेलनंतर फ्लिपकार्टचा दिवाळी सेल सुरू होत आहे. एक्सचेंज बोनस, नो कॉस्ट ईएमआय सुविधासुद्धा उपलब्ध असणार आहे, तर फ्लिपकार्टप्रमाणे ऍमेझॉनमध्येसुद्धा दिवाळी स्पेशल सेल सुरू होणार आहे.
गोव्याच्या समुद्रकिनारी नौदलाचा युद्धाभ्यास
हिंदुस्थानी नौदल आणि रॉयल ओमान नौदल यांच्यात द्विपक्षीय अभ्यास नसीम अल बह गोव्याच्या समुद्रकिनारी पार पडला. हा अभ्यास 13 ते 18 ऑक्टोबरपर्यंत चालला. हिंदुस्थानी नौदलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर या अभ्यासाची माहिती शेअर केली. या अभ्यासात तोफेने गोळीबार, क्लोज रेंज अँटी एअरक्राफ्ट फायरिंग, युद्धाभ्यास आणि सी एप्रोचसारख्या कवायती करण्यात आल्या.