मेहंदीला चढला महागाईचा रंग, डिझाईनप्रमाणे दर वाढले

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना महागाईचे चटके चांगलेच जाणवत आहेत. प्रत्येक ठिकाणी वस्तूचे दर वाढले असतांना आता ऐन सणासुदीच्या तोंडावर मेहंदीचे दर अवाच्या सवा वाढले आहेत.

महागाईची झळ सण-उत्सवांनाही बसत आहे. देशभरात रविवारी करवा चौथ साजरी झाली. करवा चौथच्या निमित्ताने मोठय़ा हौशेने महिला हातावर मेहंदी काढतात. ही मेहंदीही महाग झाली आहे. मेहंदी काढण्याचा खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी मेहंदी काढण्याचा खर्च 150 ते एक हजार रुपये एवढा होता. या वर्षी तो वाढून 1500 रुपयांपर्यंत झाला.

मेहंदी काढण्याचा खर्च वाढलाय. कारण मेहंदीच्या किमती वाढल्या आहेतच, पण त्यामागे अन्य कारणेही आहेत. गेल्या वर्षीपर्यंत हे दर अनुक्रमे 150 रुपये ते 250 रुपये होते. मेहंदीच्या डिझाईनप्रमाणे हे दर कमी-जास्त होतात. मेहंदी आर्टिस्ट ज्या दुकानांच्या बाहेर किंवा सोसायटय़ांच्या बाहेर मेहंदी काढायला बसतात, ते दुकानदार मेहंदी आर्टिस्टकडून कमिशन घेतात. हे कमिशनही या वर्षी 50 टक्के एवढे झाले आहे.

– मेहंदी आर्टिस्टच्या माहितीनुसार, या वेळी मेहंदीचे कोन महाग झाले आहेत. जवळपास दुप्पट झाले आहेत. ब्रॅण्डेड कोन असेल तर आणखी महाग.

– एका हातावर एकाच बाजूने मेहंदी काढायला 200 रुपये घेतात. दोन्ही हातांवर एका बाजूने मेहंदी काढण्यासाठी 300 रुपये घेतले जातात. असे एका मेहंदी आर्टिस्टने सांगितले.