विज्ञान रंजन – कारवीचा फुलोरा

>> विनायक

तीस-चाळीस वर्षे, दऱ्या-डोंगरात आणि गडकिल्ल्यांवर भ्रमंती करताना तिथला निसर्ग, शेती, पाणी व्यवस्था, आसपासच्या गावात आणि पाडय़ांवर राहणारी माणसं या सगळय़ांचा परिचय झाला. आमच्या तरुणपणातला हा काळ साधारण 1970 ते 2000 पर्यंतचा. नंतर इतर व्यापात ही आवड मनात असूनही जोपासण्याची संधी अनेकदा हुकली. त्यात पत्रकारिता म्हणजे फुलटाइम नव्हे तर ऑलटाइम जॉब असं मानण्याचा तो काळ. सणासुदीचा सुद्धा विचार न करता आवश्यक तेव्हा कार्यरत होण्यासाठी एक प्रकारचा आनंद होता, परंतु कॉलेज काळात आणि नंतरही अनेकदा सहय़ाद्री पर्वतरांगांमधल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता आला आणि रॉकक्लायंबिग वगैरे गोष्टींचा थरारही अनुभवता   आला. आता मागे पाहताना किंवा हल्ली यू-टय़ुबवर तरुणांचे असे व्हिडीओ पाहताना वाटतं, खरंच याच मार्गाने आपणही अशाच ऊर्जेने गेलो होतो का? त्या काळात फोटोग्राफीची साधनं सर्वांच्या हाती नव्हती. दहा जणांत एखाद्याकडे बरा कॅमेरा असायचा. तसे माझ्याकडेही मिनोला आणि याशिका हे कॅमेरे होते. पण 35 फ्रेमचा रोल जपून वापरावा लागायचा. शिवाय बरीचशी फोटोग्राफी ब्लॅक ऍण्ड व्हाइट आणि नंतरच्या रंगीत फोटोंमधले रंग आता उडालेले दिसतात.

परंतु मनात मात्र ती सारी चित्रं आजही ताजी आहेत. या सगळय़ाचं स्मरण झालं ते कारवीच्या सध्याच्या बहरावरून. आम्ही दर सात-आठ वर्षांनी फुललेली कारवीची सुंदर फुलं किमान तीन-चार वेळा पाहिली. एरवीही तुरळकपणे एखादं झाड फुललेलं दिसायचं. परवा माझा मित्र प्रदीप नायक, तरुण मुलांना घेऊन माहुलीला जाऊन आला तेव्हा त्यालाही असाच अनुभव आला. पण त्याने पूर्वी काढलेले कारवीच्या बहराचे फोटो चांगले आहेत. त्यातलाच एक या लेखासाठी वापरलाय.

प्रश्न असा की, कारवी सात ते आठ वर्षांच्या ‘विश्रांती’नंतर का फुलते? इतर फुलांसारखी दर वर्षी का बहरत नाही? यासाठी कारवी दर्शनाच्या मनरंजनाप्रमाणेच त्यामागचं थोडंसं विज्ञानही जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या झुडूप (बुश) प्रकारच्या वनस्पतीचे वनस्पती शास्त्र्ाात विविध प्रकार वर्णन केलेत. स्ट्रॉबिलेन्थेस कॅथियाना नावाचा एक प्रकार असतो. कर्नाटक ते तामीळनाडूत सहय़पर्वताच्या रांगांना नीलगिरी असे नाव आहे, तर कारवी फुलांना कुरुंजी किंवा नीलकुरुंजी म्हणतात. ही फुलं तशीच निळी जांभळी दिसतात. त्यावरून कारवी शब्द आला का? कारवीचं दुसरं वैज्ञानिक नाव स्ट्रॉबिलेन्थेस कॅलोसा किंवा कार्व्हिया. ही फुलं आपल्याकडे महाराष्ट्रात फुलतात. कारवी शब्द यातील कार्व्हियाच्या जवळचा वाटतो.

या विषयीचे वनस्पती शास्त्र्ााच्या दृष्टीने संशोधन केले ते त्यांनी एकोणीसाव्या शतकात. या प्रकारच्या झुडुपांच्या जगात 350 प्रजाती असून त्यापैकी 46 हिंदुस्थानात आहेत. यातील प्रत्येक प्रजातीचा फुलण्याचा किंवा बहराचा काळ वेगवेगळा असतो. अगदी एक ते बारा वर्षांपर्यंतच्या कालक्रमाने ही फुलं फुलतात. आपल्या सहय़ाद्रीमधली कारवी सात-आठ वर्षांनी फुलते, ही माहिती आम्हाला 55 वर्षांपूर्वीच तिथल्या स्थानिकांकडून मिळाली होती. एकदा एका भ्रमंतीत अविचलपणे कारवीचा बहर पाहायला मिळाला. असंच एका भटकंतीत तेव्हा माणसांनी बिलकुल न गजबजलेलं ‘कास’चं फुललेलं पठार पाहायला एका शेतकरीदादाने आम्हाला बैलगाडीतून उत्साहाने नेलं होतं!

कारवीच्या झुडुपाची उंची सहा ते वीस फुटांपर्यंत जाते. त्याचा खोडाचा व्यास मात्र दोन ते तीन इंच एवढाच राहतो. साधारणपणे, जुलै ते सप्टेंबरपर्यंत फुलणारी कारवी पावसात हिरवीगार दिसू लागते आणि पाऊस संपताच पानगळ होत होत उन्हाळय़ात फक्त काटकुळे सुकलेले ‘खोड’ उरते. पण पुन्हा पाऊस येताच हे शुष्क झुडुप बहरू लागते आणि सात-आठ वर्षांनंतर फुलते अनेक वर्षांनी फुलणाऱया वनस्पतींची गणना ‘प्लिटेसिअल’ प्रकारात होते. ही वनस्पती शास्त्र्ाातली नावं केवळ माहितीसाठी दिली आहेत. एखाद्याला उत्साह असेल तर ती व्यक्ती याचा अधिक मागोवा घेऊन अभ्यास करू शकते.

कारवीच्या फांद्या खडबडीत, टोचणाऱया असतात. त्याची पांढरी-निळी-जांभळी फुलं आकर्षक दिसतात. त्यातील केसर (तंतू) तीव्र गंध पसरवतात. सात-आठ वर्षांचा फुलोरा संपला की पुढच्या ‘पिढी’च्या जन्मासाठी बीजारोपण करून कारवीची झाडं नष्ट होतात आणि नवी उगवत राहतात आणि कारवीचं हे वैशिष्टय़पूर्ण जीवनचक्र अव्याहत सुरू राहतं.

आपल्याकडे कारवी मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, मुंबईतल्या तुळशी तलावाभोवतीच्या जंगलात आणि तानसा, वैतरणा परिसर तसंच माळशेज घाटात, नाशिक भागात, तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरात आणि कोकणातही अनेक ठिकाणी फुलताना दिसते. सततचं ‘गॅझेट’मधलं लक्ष काढून जरा निवांतपणे वर्षभराच्या बदलत्या ‘ऋतुचक्रा’कडे कुतूहलाने पाहिलं तर लेखिका दुर्गाबाई भागवत यांच्याप्रमाणेच, आपल्यालाही हा निसर्ग मोहित केल्याशिवाय राहणार नाही. ‘वेळ नाही’ हे कारण नको. विराट आनंदासाठी वेळ काढावा लागतो. पहा पुढच्या वर्षी जमलं तर!