गुन्हेगारांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात मावळते मुख्यमंत्री आघाडीवर; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर याने शिंदे गटात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत हल्लाबोल केला आहे.

याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट करत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, अतिशय धक्कादायक ! गुन्हेगारांना सामाजीक प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्यात खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष आघाडीवर आहे. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा का वाजले याच्या काही कारणांपैकी हे एक प्रमुख कारण…! प्रख्यात पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला खोके सरकारच्या घटक पक्षाने पावन करुन घेतले. या सरकारला न्यायाच्या राज्याबाबत शून्य आदर आहे. म्हणूनच महाराष्ट्राला खोके सरकारला नाकारणारे आणि कायद्याचा आब आणि आदर करणारे शासन हवे आहे, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

पत्रकार गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी गोळ्या घालून बंगळुरूतील त्यांच्या राहत्या घराबाहेर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी अमोल काळेची एसआयटीने चौकशी केली. तपासातून समोर आले की, गौरी लंकेश यांची हत्या होण्यापूर्वी आणि नंतर श्रीकांत पांगारकर हा अमोल काळेच्या संपर्कात होता. त्याने आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.