फिट है बॉस! ना सराव, ना प्रशिक्षण; 1 केळी अन् 2 खजूर खाऊन मुख्यमंत्री अब्दुल्ला 21 KM धावले

जम्मू-कश्मीरमध्ये रविवारी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीमध्ये कश्मीर मॅरेथॉन झाली. यात 13 देशातील जवळपास 2 हजारांहून अधिक एथलिट्सनी भाग घेतला. खोऱ्यातील ही पहिली आंतरराष्ट्रीय एथलिट स्पर्धा होती. या स्पर्धेत 54 वर्षीय ओमर अब्दुल्ला यांनीही भाग घेतला आणि 2 तासांमध्ये हाफ मॅराथॉन (21 किलोमीटर) पूर्ण केली.

विशेष म्हणजे कोणताही सराव किंवा प्लॅनिंग न करता अब्दुल्ला यांनी हे अंतर पार केले. अब्दुल्ला यांनी ट्विट करत कोणतेही विशेष प्रशिक्षण न घेता 5 मिनिट 54 सेकंद प्रति किलोमीटर धावत आपण हे अंतर पार केल्याचे सांगितले.

ओमर अब्दुल्ला यांनी अन्य एका ट्विटमध्ये म्हटले की, मी माझ्या आयुष्यात कधीही एका दमात 13 किलोमीटरहून अधिक धावलेलो नाही. पण आज माझ्यासारख्या हौशी धावपटुंचा उत्साह पाहून मला प्रेरणा मिळाली आणि मी पुढे जात राहिलो. योग्य प्रशिक्षण नाही, धावण्याचा काही प्लॅन नाही. वाटेत एक केळी आणि दोन खजूर खाल्ले. खास गोष्ट म्हणजे मी माझ्या घराजवळून धावत होतो तेव्हा माझ्या कुटुंबीय आणि इतर लोक माझा उत्साह वाढवत होते.

दरम्यान, कश्मीर मॅराथॉनमध्ये 13 देशातील धावपटुंनी भाग घेतला. या स्पर्धेत 35 स्थानिक, 59 आंतरराष्ट्रीय एथलिट्स उतरले होते. जम्मू आणि कश्मीर पर्यटन विभागाने याचे आयोजन केले होते.