‘मुळशी पॅटर्न’ मोडीत काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, कायदा व सुव्यवस्थेचे निर्माण होणारे प्रश्न आदी बाबींचा विचार करून पोलीस आयुक्तालयाच्या वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी पोलीस ठाण्यांचे विभाजन करून काळेवाडी, बावधन, दापोडी आणि संत तुकारामनगर पोलीस ठाणे अशी चार नवीन ठाणी अस्तित्वात आली आहेत. त्यामुळे आयुक्तालयाच्या अखत्यारीत पोलीस ठाण्यांची संख्या 23 वर पोहोचली आहे. बावधन हद्दीत मुळशी तालुक्यातील काही गावांचा समावेश झाल्याने ‘मुळशी पॅटर्न’ गुन्हेगारी मोडून काढणे, दापोडी हद्दीत झोपडपट्टी दादांच्या मुसक्या आवळणे, काळेवाडीत असणारा सराईतांचा वावर आणि संत तुकारामनगर हद्दीत असणाऱ्या झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू सोसायट्यांचा समावेश यामुळे पोलिसांना वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून गुन्हेगारांवर आपली जरब बसवावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. यामध्ये पुणे ग्रामीणच्या कार्यक्षेत्रातील 5 आणि पुणे शहर यांच्या कार्यक्षेत्रातील 10 पोलीस ठाणी आयुक्तालयात वर्ग करण्यात आली. त्यानंतर देहूरोड, तळेगाव-दाभाडे आणि चाकण पोलीस ठाण्यांचे विभाजन करून रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे-एमआयडीसी अशी तीन पोलीस ठाणी यापूर्वी सुरू करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच नवीन सायबर पोलीस ठाणीही कार्यान्वित करण्यात आले आहे. आता बावधन, काळेवाडी, दापोडी आणि संत तुकारामनगर अशी चार नवीन ठाणी अस्तित्वात आल्याने पोलीस ठाण्यांची संख्या 23 झाली आहे.

काळेवाडीत सराईतांवर ‘वॉच’ची गरज

दीड लाखाच्या पुढे संमिश्र लोकसंख्या असलेल्या काळेवाडी, रहाटणी या भागांत मागील काही वर्षांपासून भुरटी भाईगिरी वाढू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच कुरबुरी सुरू असतात. वाकड पोलीस ठाण्यापासून हा भाग साडेचार किलोमीटर अंतरावर असल्याने पोलीस मदत तत्काळ मिळवणे पूर्वी शक्य नव्हते. मात्र, आता काळेवाडी, रहाटणीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्याने परिसरात पोलिसांची वर्दळ वाढली आहे.

झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू सोसायट्या

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू सोसायट्यांचा मोठा भागआहे. उपलब्ध मनुष्यबळावर नागरिकांना वेळेत प्रतिसाद देणे पोलिसांना शक्य होत नव्हते. तक्रारदार यांना चार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर चिंचवड स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी जावे लागत होते. दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांचा भाग तोडून संत तुकारामनगर पोलीस ठाणे सुरू करण्यात आले आहे. ज्यामुळे आता नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

बावधनला ‘मुळशी पॅटर्न’ रोखण्याचे आव्हान

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत असलेल्या गावांचा आयटी हबमुळे कायापालट झाला आहे. हिंजवडीहद्दीत बावधन खुर्द, बावधन बुद्रूक, सुस ही गावे येतात. बावधन परिसरात मोठ्या शैक्षणिक संस्था आल्या असून, तेथे परप्रांतीय विद्यार्थी, कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास येऊ लागले आहेत. नवीन बावधन पोलीस ठाणे झाल्यामुळे या भागात आता पोलिसांचा वावर वाढणार आहे. ‘मुळशी पॅटर्न’ गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मोक्का, तडीपारीसारख्या प्रभावी कारवाया कराव्या लागणार आहेत. तरच, तालुक्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवणे शक्य होणार आहे.