आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. शनिवारीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये 10 तास बैठक झाली. या बैठकीनंतर आज रविवारी दुपारी साडे बारा वाजता शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक होत आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संजय राऊत म्हणाले की, ‘कालच्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आज सकाळी माझी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर आज 12.30 वाजता मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील आणि यासाठी आमच्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल. आम्ही सगळे मातोश्रीवर जाऊ, चर्चा करू आणि पुढल्या वाटचालीसंदर्भात काय निर्णय घ्यायचा तो ठरवू.’
‘महाविकास आघाडीचा पाया टिकला पाहिजे असे आम्हाला वाटते. ती सगळ्यांची जबाबदारी असून आम्ही सगळे कसोशीने प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळेच महाराष्ट्रात संविधान बजावची मोहीम यशस्वी करू शकलो आणि नरेंद्र मोदींचा पराभव करू शकलो. विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे या चौकडीचा पराभव सहज करू शकतो. त्या दृष्टीने आमची पावले पडताहेत. कुणी काही म्हणू द्या, या राज्यात सत्ता परिवर्तन होणार हे नक्की’, असा ठाम विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
View this post on Instagram