जखमी महिलेच्या मदतीला शिवसैनिक धावले; रेल्वेतून पडल्याने घाटीत केले दाखल

जनशताब्दी रेल्वेतून प्रवास करणारी महिला मुकुंदवाडी रेल्वे स्थानकात पडून जखमी झाली. या जखमी महिलेच्या मदतीला शिवसैनिक धावून गेले. अँब्युलन्य बोलावून जखमी महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंगोली ते मुंबई या दरम्यान धावणारी जनशताब्दी रेल्वे सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनमध्ये दाखल झाली. याच रेल्वेतून ब्रिजवाडी येथील रमाबाई सोनवणे ही महिला प्रवास करत होती. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवर उतरायचे होते. मात्र, चुकून त्या मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर उतरण्यासाठी दरवाजासमोर आल्या आणि तोल जाऊन पडल्या. त्यामुळे त्यांना जबर मार लागला आहे. सदर महिलेचा हात फॅक्चर झाला आहे. रेल्वेतून पडल्याने जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी ‘शिवशक्ती-भीमशक्ती-लहूशक्ती’ या ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख शंकर शिंदे धावून आले. त्यांनी महानगर संघटक सुकन्या भोसले यांना या घटनेसंदर्भात माहिती दिली. त्याही घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. 108 नंबरवर फोन करून अँब्युलन्स मागवून घेत मदत केली. अँब्युलन्स घटनास्थळी विलंबाने दाखल झाली. यावेळी या शिवसैनिकांसह विजय गायकवाड, अजय सानपे, रवी असवले, विजय पडूळ, नंदू ढगे यांनी जखमी महिलेला मदत केली. जखमी महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.