तुम्हाला आमचा जीव एवढा स्वस्त वाटतो का? कंत्राटी वीज कामगारांचा संतप्त सवाल

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जीव धोक्यात घालून दिवसरात्र काम करावे लागते. हे काम करताना खूप काळजी घ्यावी लागते. एखादी चूकही जीवावर बेतू शकते. तरीही आम्ही प्रामाणिकपणे काम करीत असतो. या जोखमीच्या कामासाठी मात्र आम्हाला सुरक्षेसाठी कोणतीही साधने पुरवली जात नाहीत. काम करताना विजेचा शॉक लागून कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तरीही महावितरण कंपनी आणि कंत्राटदारांनाही जाग येत नाही. त्यांना आमचा जीव एवढा स्वस्त वाटतो का?, असा संतप्त सवाल कंत्राटी वीज कामगारांकडून केला जात आहे.

राज्यभरात महावितरण विभागात जवळपास 22 हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. टूल किट, पक्कड, रबरी हातमोजे, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, झुला, हेल्मेट, रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी बॅटरी, बूट यांसारख्या सुरक्षित साधनांची आवश्यकता असते. कंत्राटी कमगारांना सुरक्षा साधने पुरवणे आवश्यक आहे. महावितरणने ही साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, कंपनीकडून आम्हाला साधा टेस्टरही दिला जात नाही. कामासाठी साहेबांचा फोन मात्र सारखा खणखणत असतो. सुरक्षित साधनांशिवाय स्वतःचा जीव धोक्यात वीजपुरवठा दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. वीजपुरवठा दुरुस्तीचे काम करताना विजेचा शॉक लागल्याने दरवर्षी तीस ते चाळीस कंत्राटी कामगारांचा मृत्यू होत आहे. तरीही आमच्याकडे लक्ष दिले जात नाही. कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे आम्हाला कोणतेही भत्ते मिळत नाहीत. गाडीत पेट्रोलही स्वतःच्या पैशाने टाकून फिरावे लागते. आमच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी कोणाला वेळ नाही. अशा बिकट परिस्थितीत आम्ही काम करीत आहोत. बाहेर रोजगार मिळत नसल्याने मजबुरीने जीव धोक्यात घालून आम्हाला हे काम करावे लागत आहे.

16 कंत्राटी वीज कामगारांना अतिशय बिकट परिस्थितीत काम करावे लागत आहे. कामगारांना कामासाठी साधा टेस्टरही दिला जात नाही. त्यामुळे सुरक्षित साधनांशिवाय जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे. इतर सोयी-सुविधा राहू द्या, पण किमान कंत्राटी कामगारांना सुरक्षित साधने तरी पुरवणे आवश्यक आहे.
– नीलेश खरात, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ

88 कायमस्वरूपी कामगारांना जी सुरक्षेची साधने दिली जातात, ती आम्हाला दिली जात नाहीत. सुरक्षित साधने नसतील, तर काम करताना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरण कंपनीने आम्हाला सुरक्षेची साधने पुरवावीत.
– श्रीकांत कदम, कंत्राटी वीज कामगार