सातारा जिल्ह्यात मान्सूनोत्तर पाऊस सुरूच असून, कोयना पाणलोटक्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा 105 टीएमसीवर पोहोचला. परिणामी, धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे कोयनेतून सध्या 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात मागील वर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. त्यामुळे पश्चिम भागातील धरणेही भरली नव्हती. तसेच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जून महिना उजाडेपर्यंत टंचाईचा सामना करावा लागला. पण या वर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा राहिली आहे. त्यातच या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनचा पाऊस दाखल झाला.
जून महिन्यातही समाधानकारक हजेरी लावली. यामुळे पश्चिम भागातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी, कोयना आदी प्रमुख धरणांत पाणीसाठा काढू लागला आहे. तर, जुलै महिन्यात पावसाचा अधिक जोर होता. त्यामुळे तळाला असलेली धरणे भरू लागली. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांतही दमदार पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत. त्यातच सध्याही जिह्यात पाऊस पडत आहे.
पश्चिम भागातील कोयना धरण, कांदाटी खोरे, महाबळेश्वर भागात पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणात संथ गतीने पाण्याची आवक होत आहे. कोयना पाणलोटक्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून एक हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यानंतरही पाऊस झाल्याने धरणातील पाणीपातळी 105.3 टीएमसीपर्यंत पोहोचली.
धरण 99 टक्क्यांवर भरल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पहाटेच धरणाचे सर्व सहा दरवाजे एक फुटाने उचलून नऊ हजार 546 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास धरणातून एकूण 10 हजार 596 क्युसेक विसर्ग सुरू झाला. परिणामी, कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.