भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले त्याच्याच आधारे आतापर्यंत कारभार सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार या पवित्र संविधानाला धक्का लावण्याचे काम करीत आहे. मात्र आम्ही कदापिही ते होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दात समाजवादी पार्टीचे नेते, खासदार अखिलेश यादव यांनी केंद्राला सुनावले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव हे आज धुळे जिल्हय़ाच्या दौऱयावर आले होते. या वेळी जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, वेळोवेळी घेतले जाणारे निर्णय हे आता सरकारच्या अंगाशी येत आहेत. आदी ‘चारशे पार’चा नारा दिला व आता टेकूच्या आधारे सरकार चालवण्याची वेळ नरेंद्र मोदींवर आली आहे. वाढत्या महागाईला महाराष्ट्रातील जनता पंटाळली असून येत्या निवडणुकीत महायुतीला जागा दाखवल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हरयाणातील चूक महाराष्ट्रात होणार नाही
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही इंडिया गठबंधनचाच एक भाग आहे, असे स्पष्ट करून अखिलेश यादव यांनी सांगितले की, वेळ पडली तर आम्ही येथे कमी जागा लढवू, पण हरयाणात झालेली चूक महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटपाची चर्चा निश्चित यशस्वी होईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान धुळे शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन समाजवादी पार्टीचे इरशाद जहागिरदार यांनी दिले.