चोराच्या 10 बायका अन् 6 प्रेयसी, विमान आणि जग्वारमधून प्रवास

गाझियाबादमध्ये एका अशा चोराला अटक करण्यात आली आहे. त्याची संपूर्ण उत्तर प्रदेशात चर्चा सुरू आहे. हा चोर साधासुधा नाही. हा चोर थेट विमानातून प्रवास करायचा. तो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबायचा. हॉटेलमध्ये येण्यासाठी तो थेट जग्वार कारने यायचा. या चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. गाझियाबादच्या कविनगर कोतवाली पोलिसांनी या चोराला अटक केली. या चोराची जग्वार कार सुद्धा जप्त केली आहे. मोहम्मद इरफान उर्फ उजळे असे या चोराचे नाव आहे. तो बिहारच्या सीतामढी येथील रहिवासी आहे. चोरी करण्यासाठी इरफान आलिशान घराची रेकी करायचा. नंतर लाखो रुपयांचा माल घेऊन पसार व्हायचा.

10 बायका अन् 6 प्रेयसी

मोहम्मद इरफानला 10 बायका आणि 6 प्रेयसी आहेत. ज्या शहरात गुन्हे करण्यासाठी जायचा. त्या ठिकाणी एका मुलीशी मैत्री करायचा. चकचकीत कपडे घालण्याचा शौकीन असलेला मोहम्मद मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. नंतर तिच्याशी लग्न करायचा. इरफानची एक पत्नी जिल्हा पंचायत सदस्य आहे. तर दुसरी भोजपुरी चित्रपटाची हिरोईन आहे.