परीक्षण – जीवनवादी कथा

>> सुधाकर वसईकर   

मराठी साहित्यात कथेला उज्ज्वल परंपरा आहे. मराठी साहित्यात ग्रामीण कथा आहे, महानगरीय कथा आहे, रहस्यकथा आहे, विनोदी कथा, बालकथा आहे, फँटसी कथा आहेत, वास्तववादी कथा, भयकथा आहेत. अनेक टप्प्यांतून, आशय व रचनेनुसार मराठी कथा विविधांगाने, लवचिकतेने फुलत गेली आहे. विविध क्षेत्रांतून प्रतिभावान कथाकार पुढे येत आहेत.

पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे अर्जुन डोमाडे यांनी ‘भितुर’ कथासंग्रहाच्या निमित्ताने मराठी साहित्यात कथाकार म्हणून पहिले पाऊल टाकले आहे. प्रस्तुत कथासंग्रहातील कथा वास्तववादी आहेत. डोमाडे यांनी जे पाहिलंय, अनुभवलंय ते कथेत मांडलंय. कथेत सूक्ष्म निरीक्षण आहे. चित्रात्मकता आहे. समाजात वावरताना त्यांना जे जे काही दिसलं त्याबाबतच सूचन आहे.

‘गुढीचं कापड’ ही आत्मपरकथा. अर्जुन डोमाडे यांचं बालपण अतिशय हलाखीत गेलंय. घरात अठराविश्व दारिद्रय़. पोटाला अन्नाचे दोन कण मिळण्याची ददात. मन विदीर्ण करणारं असं चित्रण ‘गुढीचं कापड’ या आत्मपर कथेत आलंय. ‘भितुर’ ही पहिलीच शीर्षककथा आहे. भितुर हा नाशिक परिसरातील शब्द. या कथेत एक भगत असतो. मांत्रिकाचं ऐकणाऱया समाजाचं चित्रण त्यात आलंय. पण सुदैवाने त्याचा फोलपणा कथेच्या शेवटी त्यातील एक पात्र शेवंताच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती अगदी समर्थपणे त्याला उत्तर देते की, तुझ्यामुळे हे सगळं घडलं. तुझ्या नादी लागलो नसतो तर घडलं नसतं. कथानकात गुंफलेलं वेधक चित्रण मुळातून वाचायला हवे.

जन्मगाथा, सूड, वीज, निर्णय, चाकारी यासारख्या विचारप्रधान, समस्याप्रधान कथा पुढे वाचायला मिळतात. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार जैविक पातळीवर जीवन पद्धती अवलंबून आहे. त्यापैकी भय ही सगळ्यात मोठी जैविक पातळी आहे आणि डोमाडेंच्या बहुतांश कथांमधून हे भय सतत डोकावत राहतं. भितुर म्हणजे भय. हे भय साधंसुधं नाहीये. केवळ अस्वस्थ करणारं आहे. अगतिक करणारं आहे. इतकंच नव्हे तर सूडाने पेटून उठून ते गुह्याला प्रवृत करणारं आहे. सूडकथेतील संपतला चुकीच्या पद्धतीने झालेल्या अटकेचा सूड उगवायचा असतो. तो आपल्याच मुलाला सांगतो की, तुझ्या बायकोला मारून टाक आणि संपतचा सख्खा भाऊ म्हणजे सखारामला तिच्या खुनाच्या जाळ्यात अडकवायचं. अशा विलक्षण स्वभावाच्या, प्रवृत्तीच्या माणसांचं चित्रण डोमाडेंच्या कथांमधून वाचायला मिळतं.

स्वर्गात साहित्य संमेलन भरवायचंय. स्वर्गात जायचं म्हटल्यावर काय करायचं, तर साहित्यिकांना स्वर्गात आणलं पाहिजे. त्यामुळे यमराजावर हे काम सोपविण्यात येतं. इथेही भय डोकावतंच. एकमेव गमतीदार अशी कथा ह्या संग्रहात आहे. पुढे कथेत कर्ण येतो. शिवाजी सावंत यांचे संदर्भही येतात. यात लेखकाची भूमिका ठामपणे मांडली आहे. हे सर्व संदर्भ घेऊन संमेलनाबाबतची केलेली चर्चा गमतीतून चिंतनशीलतेकडे घेऊन जाण्यात लेखक यशस्वी झालाय.

मर्यादित प्रतिभा असलेल्या ह्या कथा आशय, विषयांच्या दृष्टीने सशक्त असल्या, वेगळ्या असल्या तरी कथेच्या मंत्राबरोबर तंत्रही महत्त्वाचं असतं. मग ते कथेचं शीर्षक असो, कथेचा विस्तार वा कथेचा शेवट. लेखकाने ते आत्मसात केलं पाहिजे. मात्र कथेचा मंत्र गवसल्यामुळे येणाऱया काळात ह्या कथाकाराकडून चांगल्या कथा वाचायला मिळतील अशी आश्वासकता लेखनात दिसून येते.

प्रस्तुत संग्रहात एकूण 15 कथा असून, नाशिक शहरातील ग्रामीण बोलीभाषेतल्या कथांची वीण घट्ट आहे. पोलीस खात्यातील काही अनुभवही अतिशय संयतपणे मांडले आहेत. ‘सद्रक्षणाय’ ही त्यातीलच एक चांगली कथा म्हणावी लागेल. समाजात असलेल्या समस्या आणि विविध प्रश्न कथांमधून साधेपणाने वाचकांसमोर येतात. म्हणूनच ह्या कथांमध्ये ताजेपणा आहे. त्या मनाला भिडणाऱया आहेत. सुंदर कथानुभव देणारा संग्रह वाचनीय आणि संग्राह्य आहे.

भितुर

लेखक : अर्जुन डोमाडे  

प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन  

मूल्य : रु.200/- पृष्ठे : 120