गीताबोध – विनाशी-अविनाशी

>> गुरुनाथ तेंडुलकर

मागच्या लेखात आपण पाहिलं की भगवान श्रीकृष्णांनी आता अर्जुनावर उपचार करायला सुरुवात केली आहे….

रणांगणात युद्ध करण्यासाठी गेलेला अर्जुन हातपाय गाळून धनुष्यबाण दूर ठेवून रथामधे बसला आहे. त्याला युद्धाला तयार करण्यासाठी भगवंतांनी सर्वप्रथम त्याला ‘क्षुद्रं हृदयदौर्बल्यम् त्यक्त्वा उत्तिष्ठ‘ म्हणजेच तुझ्या हृदयातील ही दुबळी आणि क्षुद्र भावना टाकून दे आणि युद्धासाठी उठून उभा रहा.‘ असा आदेश दिला. पण अर्जुन मनाने एवढा खचला होता की तो तोंडाने जरी ‘शिष्यस्ते अहं ते शिष्य त्वाम प्रपन्नम् माम् शाघि।‘ म्हणजेच ‘मी आपल्याला शरण येऊन आपला शिष्य झालो आहे. आता तुम्हीच मला योग्य अयोग्य काय ते शिकवा.‘ असं म्हणाला तरी प्रत्यक्षात मात्र तो युद्धासाठी तयारच नव्हता. ‘तोंडाने बोलणं वेगळं आणि मनात विचार मात्र वेगळेच….‘ अशी त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्याला वेगळ्याच प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे हे जाणून भगवंतांनी त्याला आत्मा, परमात्मा, जीव…. मृत्यूनंतरचं जग वगैरे सर्वसामान्यांच्या डोक्यावरून जाणाऱया कल्पना सांगायला सुरुवात केली आहे.

इथं थोडं विषयांतर करून सांगू इच्छितो की ‘थर्टी सिक्स चेंबर ऑफ शाओलिन‘ नावाचा एक सुंदर चित्रपट आहे. वाचकांनी हा सिनेमा आवर्जून पहा असं मी सांगेन. यू टय़ूबवर हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांत उपलब्ध आहे. त्या सिनेमाचं सगळं कथानक सांगत नाही पण त्यातील एक प्रसंग मात्र थोडक्यात सांगतो. या सिनेमाचा नायक- एक सामान्य शाळकरी युवक जुलमी राजसत्तेला कंटाळून शाओलिनच्या आश्रमात कुंग फू शिकण्यासाठी शिताफीनं प्रवेश घेतो. तिथल्या एका गुरुजींजवळ आपली कुंग फू शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. कुंग फू बद्दल काहीही माहिती नसलेल्या त्या युवकाला ते गुरुजी मुद्दाम सर्वात शेवटच्या चेंबरमधे पाठवतात. तिथल्या वयोवृद्ध शाओलिनजवळ जाऊन हा युवक ‘मला कुंग फू शिकवा.‘ अशी विनंती करतो. त्यावर शाओलिन त्याला ‘इथून निघून जा.‘ असं सांगतात. पण हट्टाला पेटलेला तो युवक तिथून हलायला तयारच होत नाही. ‘मला कुंग फू शिकवा. मला कुंग फू शिकवा.‘ असा हट्ट करतो. त्यावर ते शाओलिन आपल्या दोन्ही हातांनी ‘चालता हो.‘ असा इशारा करून केवळ फूंकर मारतात. आणि हा युवक विजेचा झटका बसल्यासारखा दहा-बारा फूट दूर… मागे फेकला जातो. भेदरलेला युवक पुन्हा आपल्या गुरुजींकडे येतो आणि सांगतो. ‘मला पहिल्या धडय़ापासूनच शिकवा….. एकदम पस्तिसावा धडा नको.‘

हा प्रसंग सांगण्याचं कारण म्हणजे मागच्या लेखात सांगितल्या प्रमाणे आत्मा, परमात्मा, जीवात्मा, ब्रह्म, माया…. या गोष्टी अर्जुनाच्या आकलनाच्या पलीकडच्या आहेत. या गोष्टी त्याला सांगितल्यानंतर अर्जुन स्वतच म्हणेल की ‘मला थोडं समजेल असं सांगा…..‘ भगवान श्रीकृष्ण त्याच संधीची वाट पहाताहेत.

पण त्याचबरोबर ते जे काही तत्वज्ञान सांगताहेत ते आपणही समजून घेण्याचा थोडा-फार प्रयत्न करूया.
भगवान श्रीकृष्ण पुढे सांगताहेत…..

अन्तवन्त इमे देहा नित्यस्य उक्ताः शरीरिण ।
अनाशिन अप्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत ।।18।।
न एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ।।19।।
न जायते म्रियते वा कदाचित् ।
नान्यं भूत्वा भविता वा न भूयाः ।
अजो नित्य शाश्वतो अयम् पुराण ।
न हन्यते हन्यमाने शरीरे ।।20।।
वेद अविनाशिनम् नित्यम् य एनम् अजम् अव्ययम् ।
कथम् स पुरुष पार्थ कम् घातयति हन्ति कम् ।।21।।
भावार्थ ः या श्लोकांचा भावार्थ जाणून घेण्याआधी परम पूज्य विनोबाजी त्यांच्या गीताईत काय म्हणतात ते पाहुया
विनोबाजी म्हणतात ः
विनाशी देह हे सारे बोलिले त्यांस शाश्वत।
नित्य निसीम तो आत्मा अर्जुना झुंज ह्यास्तव ।।18।।
जो म्हणे मारितो आत्मा आणि जो मरतो म्हणे ।
दोघे न जाणती कांही न मारी न मरे चि हा ।।19।।
न जन्म पावे न कदापि मृत्यु ।
होऊनि मागें न पुढे न होय ।
आला न गेला स्थिर हा पुराण ।
मारोत देहास परी मरे ना ।।20।।
निर्विकार चि हा नित्य जन्म-मृत्यूहुनी पर ।
जाणे हे तत्व तो कैसा मारी वा मारवी कुणा ।।21।।

भावार्थ ः भगवद्गीतेमधे आत्मा आणि देह यांमधील संबंध स्पष्ट करताना ‘अन्तवन्त इमे देहाः‘ असा शब्दप्रयोग केला आहे. ह्यामागचं कारण म्हणजे हा देह क्षणाक्षणाला बदलत जातो. केवळ त्यातील बदल अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे आपल्या ते ध्याननात येत नाहीत. एखाद्या नवजात बालकाचा फोटो आणि त्याच बालकाचे प्रत्येक वर्षी काढलेले फोटो एकत्र पाहिले तर आपल्या हे सहज ध्यानात येईल… माणूस तोच, पण त्याच्या देहात किती किती आणि कसे कसे बदल झाले हे पाहून आश्चर्यच वाटतं. पण त्या देहातील आत्म्यात मात्र यत्किंचितही बदल होत नाही. म्हणूनच या बाह्य देहाचं वर्णन करताना वेदव्यास मुनी ‘अन्तवन्त इमे देहाः‘ असं म्हणतात तर आत्म्याबद्दल मात्र ते अनाशिन ( नाश न होणारा) आणि अप्रमेय ( ज्याला प्रमाण देता येणार नाही केवळ शास्त्र आणि श्रद्धा यांच्या निकषावर सिद्ध होऊ शकणारा) असं म्हटलं आहे.

पुढे भगवान म्हणतात की या देहातील जे अविनाशी तत्व आहे तो आहे आत्मा. तो कधीही मरत नाही ही मारला जाऊ शकत नाही. ( न हन्यते, न हन्यमाने ) केवळ नाश पावतं ते शरीर… जे नित्यच बदलत असतं. जे कधीही शाश्वत नसतं. या शरीराला कितीही जपलं तरी कधी ना कधी तरी त्याचा नाश होणार हे निश्चितच आहे. म्हणूनच हे अर्जुना तू युद्धाला भिऊ नकोस. युद्धात जे मरतील असं तुला वाटतंय ते युद्धात जरी मेले नाहीत तरी ते अजरामर रहाणार नाहीत. म्हणूनच तू या शरीराला नित्य आणि शाश्वत समजू नकोस.

आधुनिक विज्ञानाच्या शास्त्रज्ञांनी ह्या पृथ्वीतलावर आजवर 118 मूलद्व्ये शोधून काढली आहेत. (हायड्रोजन पासून ते ओगॅनेसन पर्यंत.) या मूलद्रव्यांचा आणि त्याचं पुन्हा पृथ्थकरण करून येणाऱया घटकांचा अभ्यास करणाऱया अनेक शास्त्रज्ञांनी हे सगळं आधुनिक तत्वज्ञान हजारो वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या भगवद्गीतेतील आत्म्याच्या वर्णनाशी खूपच मिळतं-जुळतं आहे हे मान्य केलं आहे. त्याबद्दल पुन्हा कधीतरी…..

असो. भगवान श्रीकृष्ण पायरी पायरीने अर्जुनाला ताळ्यावर कसे आणताहेत हे पहातानाच आपण आपल्यातील भांबावलेल्या आणि कर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करूया.

[email protected]