‘फोन पे करा, गुगल पे करा’ पण बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलवा; गद्दार आमदार संतोष बांगर यांचे रोख आमिष

कळमनुरी मतदारसंघातील बाहेरगावी असलेल्या लोकांची दोन-तीन दिवसात यादी आमच्याकडे आली पाहिजे. आणि ‘त्यांना काय लागते ते सांगा’.. ‘फोन.. पे.. गुगल.. पे..’ करा, पण बाहेरगावी असलेल्या मतदारांना बोलावून घ्या, असे जाहीर आवाहन मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी केले.

कळमनुरी शहरातील तोष्णीवाल मंगल कार्यालयात आज शुक्रवारी मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर हे एका जाहीर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाले की, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील बाहेरगावी असलेल्यांची यादी दोन-तीन दिवसांत आमच्याकडे आली पाहिजे. त्यांना सांगायचं गाड्या करा तुम्हाला काय लागते ते सांगा… तुम्हाला सांगतो की, त्यांना काय लागते त्या पद्धतीने फोन.. पे.. गुगल..पे.?. करा.. त्यांना काय लागते ते पोहोचले पाहिजे. आता दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीमध्ये बाहेरगावी असलेले लोक आपल्या घरी येतात. दिवाळीमध्ये त्यांना सांगा बापू तुम्हाला येण्या जाण्यासाठी गाडी लागते.. काय लागते ते आम्ही देऊ.. तू आमच्यासाठी यायलास? असे त्यांना विश्वासाने सांगा. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, मतदारसंघातील बाहेरगावी असलेले मतदार हे मोठ्या संख्येने आले पाहिजे. अशा पद्धतीने मिंधे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आवाहन केले. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना आमदार संतोष बांगर यांनी एका जाहीर कार्यक्रमात मतदारांना ‘फोन.. पे.. गुगल..पे..’ वर मतदारांना पैसे पाठवा असे जाहीर वक्तव्य केले आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदारांना एक प्रकारे आमिष दाखविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे कोणती कारवाई करणार आहेतयाकडे हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करणार

मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी येथील एका जाहीर कार्यक्रमात बाहेरगावी असलेल्या मतदारांना फोन पे गुगल पे करा त्यांना काय लागते ते द्या. त्यांच्यासाठी गाड्या करा पण त्यांना बोलावून घ्या, असे वक्तव्य केले आहे.? गद्दार आमदार संतोष बांगर यांना येणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे ते मतदारांना पैशाचे आमिष दाखविण्याचे काम करीत आहेत. मतदारांना पैशाचे अमिष दाखविल्याच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे लेखी तक्रार देणार असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी सांगितले.