भिवंडीतील 40 हजार नवे मतदार निर्णायक ठरणार

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत 40 हजार मतांची वाढ झाली आहे. या मतदारांमध्ये नव मतदारांचा समावेश असल्याने त्यांनी केलेले मतदान निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. हा मतदारांचा आकडा आणखी वाढावा यासाठी भिवंडी पश्चिम मतदारसंघात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहितेदरम्यान निवडणूक प्रक्रिया कालावधीमध्ये काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी यंत्रणांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी उदय किसवे यांच्या आदेशानुसार शासकीय आस्थापनांसोबतच खासगी ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, पोस्टर काढण्याच्या सूचना महापालिका आणि पंचायत समिती प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कामतघर येथील वऱ्हाळदेवी माता मंगल कार्यालय याठिकाणी मतदारसंघाचे निवडणुका कार्यालय, ईव्हीएम मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉग रूम, मतमोजणी केंद्र उभारण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंघात दोन लाख ९२ हजार १०७ मतदार होते. त्यामध्ये १७ ऑक्टोबरपर्यंत ४० हजार ७४९ मतदारांची संख्या वाढली आहे. सध्या या मतदारसंघात तीन लाख ३२ हजार ८५६ मतदार असून त्यामध्ये एक लाख ८९ हजार ६४३ पुरुष तर एक लाख ४३ हजार ५५ महिला, इतर १५७, १६ सैनिक, एक हजार २०९ दिव्यांग व ८५ वर्षांवरील दोन हजार २५६ मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किसवे यांनी आज पार पाडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित कोल्हे, सुदाम इंगळे, बाळाराम जाधव आदी उपस्थित होते.