विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना मतदारांची रखडपट्टी होऊ नये, याकरिता निवडणूक आयोगाने अनेक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार मतदान बुथमध्ये गेल्यानंतर 52 सेकंदांत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विशेष तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. याच वेगाने मतदान झाले तर मतदान केंद्रांवरील मतदानांच्या रांगा कमी होणार आहेत. बेलापूर विधानसभा मतदारसंघातील 4 लाख 20 हजार 242 मतदारांसाठी 384 बुथ तयार करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाने या मतदारसंघात सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची फौज तयार ठेवली आहे. मतदारांचा त्रास कमी करण्यासाठी आयोगाने 12 सोसायट्यांमध्ये 25 बुथ तयार केले आहेत.
बेलापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आयोगाच्या वतीने अनेक सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. बेलापूर मतदारसंघात एकूण 384 मतदान केंद्र आहेत. ही सर्व केंद्र 96 ठिकाणी स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रांची संख्या ही एकपासून दहापर्यंत आहे. शहरात ज्या मोठ्या सोसायट्या आहेत, तिथे केंद्र तयार करण्याचा नवीन प्रयोग या मतदारसंघात करण्यात आला. त्यानुसार मतदारसंघातील १२ सोसाट्यांमध्ये २५ केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सोसायट्यांमध्ये केंद्र तयार करण्यासाठी आयोगाच्या वतीने जुलैमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. मतदाराने मतदान बुथमध्ये प्रवेश केल्यानंतर बोटांना शाई लावणे, ओळखपत्रांची तपासणी करणे, मतदाराची स्वाक्षरी, मतदान यंत्रावर मतदान, व्हीव्हीपॅट मशीनवरील स्लिप आदी प्रक्रिया 52 सेकंदांमध्येच उरकण्याचे नियोजन आयोगाने केले आहे. त्यानुसार सर्वच यंत्रणा काम करणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांची रखडपट्टी होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे, असेही अश्विनी पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
फोटो चुकीचा असला तरी मतदान करता येणार
मतदान करण्यासाठी मतदारांना ओळखपत्राचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी मतदारांना फक्त एकच ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. मतदार यादीमध्ये जर नावात चुका असतील तर त्याकडे दुर्लक्ष केले जाणार आहे. महिला मतदाराच्या नावापुढे चुकून पुरुष मतदाराचा फोटो असला तरी संबंधित महिलेला मतदान करता येणार आहे. मतदार याद्यांतील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जुने मतदार ओळखपत्रही ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येणार आहे, अशीही माहिती यावेळी अश्विनी पाटील यांनी दिली.
साडेचार हजार कर्मचारी बेलापूरमधील
बेलापूर विधानसभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सुमारे ४ हजार ४०० कर्मचारी निवडणुकीसाठी कार्यरत आहेत. यापैकी बहुतेक कर्मचाऱ्यांची नियुक्तीही या मतदारसंघाच्या बाहेर करण्यात आली आहे. मतदारसंघात ४ हजार ४९३ मतदारांचे वय हे ८५ वर्षांपेक्षा जास्त आहे. दिव्यांग मतदारांची संख्या २ हजार ५७ आहे. या दोन्ही गटांतील मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या मतदारांना रांगेत उभे न राहताच मतदान करता येणार आहे. बेलापूर मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ८ हजार ९८० इतकी आहे.