कला परंपरा – शुभ्र चकाकणारी मंगलमय चांदी

>> डॉ.मनोहर देसाई

सोन्याच्या दागिन्यांसोबतच चांदीच्या दागिन्यांनाही तितकीच पसंती दिली जाते. हल्ली तर चांदीचे दागिने वापरण्याची फॅशन पुन्हा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर असणारे हुपरी हे गाव चांदीच्या दागिन्यांच्या वैविध्यपूर्ण घडणावळीसाठी प्रसिद्ध आहे. चांदीचे दागिने घडवण्याचा पिढीजात व्यवसाय करणारी अनेक कुटुंबं इथे आहेत. घडणावळीच्या कलेवर आयुष्य समर्पित करत ही कलापरंपरा त्यांनी जतन केली आहे.

प्रत्येक स्त्रीला दागिना हा तिच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा घटक वाटत असतो. याला काही स्त्रिया अपवादही असतील, पण दागिना हा तसा खूप जिव्हाळ्याचा विषय. सणासुदीला किंवा घरातील एखाद्या मंगलकार्याच्या प्रसंगी दागिने खरेदी ही होतच असते. सध्या अनेक मोठमोठय़ा कंपन्या या व्यवसायात उतरल्या असून त्यांनी अतिशय भव्य अशी शोरूम उभारली आहेत. पूर्वी ज्याप्रमाणे विविध कामांसाठी विविध कारागीर समाजाला त्या सुविधा उपलब्ध करून देत असत, त्यामध्ये सोनार काम करणारे कारागीरसुद्धा येत असत. एखाद्या कुटुंबातील जाणती व्यक्ती अगदी कौतुकाने सांगत असे की, ‘आमच्या कुटुंबाचे दागिने फार पूर्वीपासून अमुक अमुक सोनाराच्या पेढीमधूनच खरेदी केले जातात. आमच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून आजपर्यंत कधीही आमची एक पैशाचीसुद्धा फसवणूक झालेली नाही. आम्हाला जशा डिझाईन हव्या असतात अगदी तशाच डिझाईन त्यांच्याकडे उपलब्ध असतात वगैरे वगैरे.’ एखाद्या कुटुंबाला हल्ली जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा पूर्वी हा सोनार असायचा. समाजाची आर्थिक स्थिती आता बदलली आहे आणि दागिन्यांचे काम करणारे हे एकेकाळचे कारागीर आता एखादे छोटे दुकान, शोरूम किंवा काही मोठय़ा व्यावसायिकांनी तर अनेक शोरूम थाटून त्यांच्या दागिने व्यवसायाच्या नावांमध्ये प्रायव्हेट लिमिटेड वगैरे वगैरे शब्द जोडले गेले आहेत. दागिन्यांमध्ये चांदीमध्ये काम करणारे अनेक कारागीर हे त्यांच्या कारागिरीमुळे प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातल्या काही गावांमधून आजही काही कुटुंबे हा व्यवसाय उत्तम प्रकारे करत आहेत. शहरातून त्यांच्याकडे अनेक मोठे व्यापारी कामे करून घेत त्यांना व्यवसायसुद्धा देत आहेत.

एखाद्या घरात नवीन बाळ जन्माला यावं आणि मग त्या बाळासाठी लागणाऱया दागिन्यांची तयारी सुरू होते. बाळाला चांदीचा कंबरपट्टा, बाळ रांगेल व दिवसभर त्याचे पाय हलत राहतील त्या वेळेला त्याच्या पायातील पैंजणांचा आवाज येईल. त्याच्या हातात कडे आणि पायात वाळे हवेत. जर मुलगी असेल आणि ती मोठी झाली तर तिच्या पायात पैंजण हे हवेच. तिच्या पायावरील पैंजणांना शोभिवंत आकारांनी सजवत अनेक डिझाइन्स आकार घेतात. लग्नाच्या वेळी तिच्या पायात जोडवीसुद्धा घालतात. चांदीमध्ये काम करणाऱया अशाच कारागिरांच्या कलेविषयी आज माहिती करून घेऊ.

मध्यंतरी राजस्थानमध्ये जयपूरला एका कार्पामासाठी जायचे होते. कार्पामाचे ठिकाण असणाऱया पत्त्यामध्ये ‘चांदी की टकसाल’ असा उल्लेख होता. कार्पामस्थळी पोहोचल्यानंतर थोडा वेळ असल्यामुळे तेथील एका जाणत्या व्यक्तीला ‘चांदी की टकसाल’ याविषयी विचारले. त्याने छाती फुगवत अगदी कौतुकाने सांगितले की, या भागामध्ये जयपूरच्या राजघराण्याकडून चांदीची नाणी तयार करण्याची कामे दिली जात असत. हे चांदीचे दागिने नाणी व देवांचे टाक या ठिकाणी तयार होत असत. त्यामुळे या भागाला ‘चांदी की टकसाल’ असे नाव पडले. महाराष्ट्रामध्येसुद्धा सोने आणि चांदी या धातूंमध्ये काम करणारे कारागीर त्यांच्या कलाकुसर व विशिष्ट शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे तसं रांगडय़ा कुस्तीसाठी प्रसिद्ध. पण याच कोल्हापूरच्या हातकणंगले येथील हुपरी गावामध्ये चांदीचे काम मोठय़ा प्रमाणात चालते. हुपरी हे तसं कोल्हापूर आणि कर्नाटक यांच्या बॉर्डर वरचं गाव. त्यामुळे गावात भाषेमध्येसुद्धा काही ठिकाणी कानडी सूर आढळतो, तर गावातील या व्यावसायिकांकडील काही ग्राहक हे आग्रहाने कर्नाटकची वेस ओलांडून या गावात येऊनच आपल्या चांदीच्या दागदागिने कामासाठी आग्रह धरतात.

महिलांच्या पायातील पैंजणांमध्ये छोटे नाजूक घुंगरू समाविष्ट असतात. छोटय़ा लटकणाऱया या घुंगरांचा आवाजही खूपच वेगळा असतो. हुपरी गावातील दागिन्यांमध्ये वापरलेले घुंगरू हे इतर ठिकाणच्या घुंगरांपेक्षा खूप वेगळे आहेत याचा उल्लेख येथील कारागीर आवर्जून करतात. गावातील अनेक कुटुंबे या व्यवसायात जरी असली तरी त्यातील काही निवडक पवार, कांजळे, शिंदे या कुटुंबातील कारागिरांच्या भेटी घेता आल्या. पैंजणांमधल्या रूपाली, गजाली अशा काही प्रकारांविषयी माहिती सांगताना ही मंडळी या कलेवर आपण आयुष्य समर्पित करत कसे काम करत आहोत याची अनेक उदाहरणे देतात.

चांदीच्या दागिन्यांमध्ये तळे, वाळे, कडे, पैंजण, देवासाठी लागणारी पूजेची सर्व भांडी, औक्षणासाठी लागणारी ताटे, चांदीचे ग्लास अशा विविध वस्तू तयार करण्याची कामे या गावात होत असतात. अनेक मंदिरांमध्ये चांदीची प्रभावळ तयार करून घेतली जाते व त्यासाठी या कारागिरांकडे संपर्क साधला जातो. चांदीच्या धातूमध्ये ठेवलेले पाणी प्यावे किंवा अंगाखांद्यावरून स्नान करताना चांदीच्या दागिन्यांवरून पाणी खाली जावे, चांदीच्या वाटीतून चांदीच्या चमच्याने विशिष्ट गुटी बाळाला पाजावी अशी काही शास्त्राrय पार्श्वभूमीसुद्धा या धातूमध्ये आहे व आयुर्वेद विषयात काम करणारे तज्ञ या धातूचा वापर करावा असा सल्ला ग्राहकांना देतात याची माहिती हे कारागीर आवर्जून देतात.

कारागिरांशी चर्चा करताना एक गोष्ट आवर्जून जाणवली ती म्हणजे हे कारागीर आजच्या संगणकीय जाहिरात आणि इतर समाजमाध्यमांपासून खूप दूर आहेत. शेतीविषयक व्यवसाय करणाऱया शेतकऱयांसाठी अनेक अॅप उपलब्ध आहेत. शेतकरी ते ग्राहक, शेतातून थेट मॉलमध्ये, तुम्हीच निवडा तुमची आवडती भाजी वगैरे प्रकारांमध्ये शेतकरी आपले पीक या माध्यमातून आपल्या ग्राहकापर्यंत आता पोहोचवू शकतो. चांदीचे काम करणाऱया या कारागिरांनासुद्धा अशा पद्धतीचे एखादे समाजमाध्यम उपलब्ध व्हावे व त्या माध्यमातून त्यांची कलाकुसर ग्राहकांनी थेट निवडून ती त्यांच्यापर्यंत या कारागिरांना थेट पोहोचण्याची इच्छा आहे. मोठमोठय़ा सोने-चांदीचे व्यवसाय करणाऱया दालनांमध्ये आपण नेहमीच जात असतो, परंतु पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱया या छोटय़ा कारागिरांच्या पेढीमध्ये आपली भेट व्हावी आणि आपल्याला थेट सेवा देता यावी ही या कारागिरांनी व्यक्त केलेली एक इच्छा आहे.

धावपळीच्या रोजच्या नित्पामामध्ये सणासुदीला दागिने खरेदी करण्याचा योग जर आलाच तर अशा काही कारागिरांच्या गावी अवश्य भेट द्यावी. कोल्हापूरच्या हातकणंगले येथील हुपरी गाव अशा ग्राहकांसाठी तत्परतेने सेवा द्यायला उत्सुक आहे. आपल्या येथील भेटीनंतर आपल्या घरातसुद्धा येथून घेतलेल्या विशिष्ट मंजूळ आवाजाच्या पैंजणांच्या घुंगरूचा आवाज नक्कीच वेगळा नाद निर्माण करेल यात शंका नाही.

[email protected]