सत्याचा शोध – जातीसाठी खाऊ नये माती!

>> चंद्रसेन टिळेकर

आपल्या समाजातील हा रानटीपणा नष्ट करायचा असेल तर गावोगावी अनिससारख्या संस्था स्थापन झाल्या पाहिजेत आणि ग्रामीण तरुणांनी त्यात सामील होऊन समाज परिवर्तनाची ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. असे झाले तर ती आज आपल्यात नसलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी आदरांजली वाहिल्यासारखे होईल!

आपल्या देशात आणि आपल्या महाराष्ट्रातही जातपंचायत नावाची वेगळी स्वतंत्र अशी काही न्यायदान देणारी संस्था असते याची शहरवासीयांना फारशी कल्पना नसते. परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक भटक्या-विमुक्त जातीत जातवार अशा जातपंचायती असतात. त्या-त्या समाजातील वयोवृद्ध पंच म्हणून निवडले जातात. या पंचांना शिक्षणाचा गंधही लागलेला नसतो. केवळ वयाची ज्येष्ठता हा एकच निकष लावून त्यांना पंचपदी बसवलेले असते. या जातपंचायती आपापल्या जातीबद्दल एक मुख्य श्रद्धा जोपासतात आणि ती म्हणजे आपली जात सर्वात श्रेष्ठ आहे. साहजिकच त्या जातीतील कुणी तरुणाने अथवा तरुणीने जातीबाहेर जाऊन लग्न केले की, त्या जातीतील काही लोकांना विशेषत: पंचांना महापातक घडल्यासारखे वाटते. जातीसाठी खावी माती हे विषारी बाळकडू त्यांनी छानपैकी रिचवलेले असते.

त्यामुळे असा विवाह म्हणजे त्यांना घोर अपराध वाटतो. अशा जोडप्याला अमानुष अशी शिक्षा तर ठोठावली जातेच, पण त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दंड ठोठावला जातो आणि काही वेळा तर तो लाखा लाखात असतो. समाज एकसंघ रहावा म्हणून सरकारी पातळीवर आंतरजातीय विवाहाचा कितीही प्रचार होत असला तरी तो एकतर तो त्यांच्या निर्जन एकाकी वास्तव्यामुळे या पंचांच्या कानावर पडलेला नसतो आणि क्वचित प्रसंगी पडला तरी एखादे किटाळ अंगावर पडल्यावर झटकावे तसा तो विचार ते झटकून टाकतात. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अनेक भटक्या-विमुक्त जातीमध्ये नवविवाहित तरुणीला कौमार्य चाचणीला सामोरे जावे लागते. ती चाचणी म्हणजे नवविवाहित जोडप्याला पांढरेशुभ्र वस्त्र दिले जाते व त्यावर लग्नानंतरचा पहिला शरीर संबंध करायला सांगतात. पंचमंडळी बाहेर अंगणात दबा धरून बसल्यासारखी बसतात. नवविवाहित तरुण काही वेळाने बाहेर येऊन ते पांढरे वस्त्र पंचांना दाखवतो. जर त्यावर रक्ताचा डाग दिसला तर ती मुलगी निष्कलंक मानली जाते, पण असा डाग दिसला नाही तर मात्र त्या तरुणीच्या कुटुंबाला प्रचंड मोठा दंड ठोठावला जातो. इतकेच नाही तर काही वेळा त्या तरुणीला पंचांबरोबर शय्यासोबतही दंड म्हणून करावी लागते. खरे तर सायकल चालविल्याने किंवा इतरही कष्टाची कामे आजकाल मुलींना करावी लागल्यामुळेही योनिपटलावर दाब पडून ते भंग पावू शकते. पण हे ज्ञान केवळ वयाच्या ज्येष्ठत्वामुळे पंचपदी बसलेल्या त्या धृढाचार्यांना कसे असणार?

हा लेख लिहीत असतानाच कुठे ना कुठे असा अत्याचार चाललेला तर नसेल ना याची सतत भीती वाटते. बहुतांश जातीत जातपंचायत असते. परंतु ही संविधान विरोधी (अ)न्याय व्यवस्था असल्याने तिची कुठे नोंद नसते. काही ठिकाणी उघड, तर काही ठिकाणी लपूनछपून जातपंचायतचे कामकाज चालते. निर्णय देताना या जातपंचायती माणुसकीला काळिमा फासणारे कसे निकाल देतात याची अंगावर शहारे देणारी घटना 2013 साली नाशिकमध्ये घडली. प्रमिला कुंभारकर या गर्भवती महिलेचा तिच्या पित्याने खून केला. कारण काय तर तसा आदेश त्यांच्या जातपंचायतीने दिला होता. असा आदेश देण्याचे कारण म्हणजे प्रमिला कुंभारकर ज्या भटक्या-विमुक्त जोशी जातीतील होती, त्या जातीच्या बाहेर जाऊन तिने आंतरजातीय लग्न केले होते आणि तिच्या जातपंचायतीच्या दृष्टीने ते महापाप होते. जातपंचायतीने तिच्या कुटुंबाला प्रमिलाचा गर्भपात करण्याचा हुकूम केला आणि तसे केले नाही तर त्यांच्या पुढच्या सात पिढय़ांवर संपूर्ण जात बहिष्कार टाकील असे कडक भाषेत खडसावले. आश्चर्य म्हणजे प्रमिलाच्या पित्याने तिला सासरहून बाळंतपण करण्याच्या निमित्ताने माहेरी बोलावून घेतले आणि सात महिने उलटून गेले असताही तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तिचा अंत झाला. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना समजताच त्यांनी आपले काही कार्यकर्ते हाताशी धरून जातपंचायतीविरुद्ध अभियानाची स्थापना केली. नाशिक शहरातलेच एक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना या अभियानाचे प्रमुख केले. त्यांच्याशी या संबंधात संपर्क केला असता आतापर्यंत त्यांनी अशा शेकडो घटना हाताळल्याचे सांगितले. डॉ. दाभोलकर केवळ एवढे करून थांबले नाहीत, तर त्यांनी या जातपंचायतीच्या कृत्यांना चाप बसेल असा कायदाही 2017 साली सरकारला करायला भाग पाडले. जादुटोणाविरुद्ध ‘अनिस’ने देशात सर्वप्रथम कायदा करायला भाग पाडले. तसाच जातपंचायतीविरुद्धचा हा देशातील पहिलाच कायदा आहे!

आपल्या समाजातील हा रानटीपणा नष्ट करायचा असेल तर गावोगावी अनिससारख्या संस्था स्थापन झाल्या पाहिजेत आणि ग्रामीण तरुणांनी त्यात सामील होऊन समाज परिवर्तनाची ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. असे झाले तर ती आज आपल्यात नसलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना खरी आदरांजली वाहिल्यासारखे होईल!

[email protected]